Join us

डोळ्याखाली काळी वर्तुळं? १ तेल आणि ५ उपाय, डोळे दिसतील कायम सुंदर-काळेपणा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 18:13 IST

मध, बदाम, खोबरेल तेल, कोरफड हे वापरुन डोळ्याखाली काळी वर्तुळं ही समस्या कमी होऊ शकते

विशिष्ट वयानंतर महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ, डार्क सर्कल तयार होतात. बरीच प्रॉडक्ट्स वापरुन पाहिली तरी ही समस्या कमी होत नाही. मात्र, घरगुती उपाय करून  डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासाठी उत्तम म्हणजे बदाम. बदामाचे फायदे अनेक आहेत. बदामाचे तेल देखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते. बदामाच्या तेलात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. बदामाचे तेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचेत बदामाचे गुणधर्म चांगल्या पद्धतीने मुरतात.  त्वचा हायड्रेट राहते आणि लवकर सॉफ्ट होते.

बदामाचे तेल कसे वापरायचे?

मध आणि बदामाचं तेल

मधामध्ये डाग आणि काळी वर्तुळे दूर करण्याचे गुणधर्म असतात. मध त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि सुरकुत्या रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे. मधामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंटसह दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. बदाम तेल आणि मध एकत्र करून डोळ्यांखाली लावायचे आणि ते मिश्रण रात्रभर ठेवायचे. सकाळी पाण्याने धुतल्यानंतर चेहरा कोरडे करावे. सेंद्रिय बदाम तेलासारखं सेंद्रिय मध वापरणे चांगले.

गुलाब पाणी आणि बदाम तेल

गुलाब पाण्यात अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स सोबत टेरपेन्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे सर्व डोळ्यांना आराम देण्यासोबतच अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करतात. त्वचेची जळजळ आणि लालसरपणा दूर करण्यासाठी गुलाब पाणी प्रभावी असल्याचे ओळखले जाते. सर्वप्रथम गुलाबजल डार्क सर्कलवर लावावे आणि कोरडे होवू द्यावे. यानंतर काळ्या वर्तुळांवर बदामाचे तेल लावून हलक्या हातांनी २ ते ३ मिनिटे मसाज करावा. आणि त्यानंतर धुवून टाकावे. गुलाबपाणीचा गुणधर्म आणि बदामातून मिळणारे व्हिटॅमिन ई यामुळे चेहरा अधिक तजेलदार आणि उठून दिसतो.

कोरफड आणि बदाम तेल

कोरफडीचे अनेक फायदे आहेत. त्यात  अमिनो ॲसिड, खनिजे, जीवनसत्त्वे यांसारखे घटक आहेत. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील आहे. जेव्हा कोरफडीचे जेल आणि बदामाच्या तेलाचे गुणधर्म एकत्र काम करतात तेव्हा चेहऱ्यावर नवी चमक मिळते. ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये समान प्रमाणात बदाम तेल मिसळा आणि डोळ्यांखाली लावा आणि १ तास राहू द्या. यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हे मिश्रण लावल्याने डोळ्यांखाली दिसणारे काळे डाग कमी होण्यास मदत होते, त्यामुळे हे मिश्रण काळ्या वर्तुळांवर सतत वापरणे आवश्यक आहे.

खोबरेल तेल आणि बदाम तेल

नारळाच्या तेलाचे फायदे अनेक आहेत. डोळ्यांखालील डाग, काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि सूज दूर करण्यासाठी त्याची अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खूप उपयुक्त आहे. त्यामुळे या तेलाचे अधिक गुणधर्म वाढवण्यासाठी बदामाचे तेल नारळाच्या तेलात मिसळून डोळ्यांखालील भागावर लावल्यास ते आश्चर्यकारक रिजल्ट देते. सर्वप्रथम, अर्धा चमचा बदाम तेल आणि खोबरेल तेल मिसळून काळ्या वर्तुळांवर हलक्या हातांनी मालिश करावे. हे तेल हळूहळू त्वचेत शोषले जाईल. रात्रभर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ करावे.

टॅग्स :डोळ्यांखाली काळी वर्तुळंत्वचेची काळजी