महिलांच्या मेकअप किटमध्ये लायनर आणि काजळला विशेष महत्त्व असतं. हे केवळ डोळ्यांचं सौंदर्य वाढवत नाही तर चेहराही छान दिसतो. अनेक महिला त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी दररोज लायनर आणि काजळचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की याचा दररोज वापर करणं धोकादायक असू शकतं.
डर्मेटोलॉजिस्ट डॉ. आरुषी सुरी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये काजळ आणि लायनर रोज लावल्याने होणाऱ्या नुकसानाबाबत सांगितलं. काजळ आणि लायनर डोळ्यांच्या थेट संपर्कात येतात. जर ते योग्यरित्या स्वच्छ केले नाहीत किंवा एक्सपायर झालेले प्रोडक्ट वापरले तर डोळ्यांमध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. यामुळे डोळे लाल होणं, खाज सुटणं आणि पाणी येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
काजळ आणि लायनरमध्ये असलेले केमिकल्स डोळ्यांसाठी खूप घातक असू शकतात. दररोज वापरल्याने डोळ्यांना एलर्जी आणि जळजळ होऊ शकते. जर तुम्ही ते दररोज लावले तर ते हळूहळू डोळ्यांच्या पृष्ठभागावर आणि पापण्यांच्या फॉलिकल्समध्ये जमा होऊ शकतात. यामुळे कॉर्नियाला नुकसान होऊ शकते आणि पापण्या गळू शकतात. काही वैद्यकीय अहवालांमध्ये असं आढळून आलं आहे की डोळ्यांवर सौंदर्यप्रसाधनांचा दीर्घकाळ वापर केल्याने दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
विशेषतः जर काजळ किंवा लायनर योग्यरित्या स्वच्छ केलं नाही आणि रात्रभर डोळ्यांवर राहिलं तर त्रास होऊ शकतो. जर तुम्ही लायनर किंवा काजळ वापरत असाल आणि तुम्हाला काही समस्या येत असतील, तर लोकल कंपनीचं लायनर वापरणं थांबवणं गरजेचं आहे. तुम्ही लिक्विड लाइनर वापरू शकता. डोळे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची नीट काळजी घ्या.