Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात आंघोळीच्या आधी करा खोबरेल तेलाची मालिश; पावसाळी आजार- शारीरिक त्रास होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 16:27 IST

पावसाळ्यात शरीराला ऊर्जा आणि त्वचेला संसर्गापासून सुरक्षेची गरज असते. आंघोळीच्या आधी खोबऱ्याच्या तेलानं मसाज (coconut oil massage) केल्यास शरीराची आणि त्वचेची ही गरज पूर्ण होते. 

ठळक मुद्देखोबऱ्याच्या तेलानं त्वचेवर नैसर्गिक माॅइश्चर निर्माण होतं. खोबऱ्याच्या तेलानं त्वचेचा संसर्ग दूर होतात. 

अंगाला तेलाची मालिश करुन आंघोळ करणं हा सुदृढ राहाण्यासाठीचा पारंपरिक उपाय आहे. हिवाळ्याच्या चार महिन्यातच अंगाला तिळाच्या तेलाची मालिश आवश्यक असते असं मानलं जातं. पण पावसाळ्यातही वेगवेगळ्या कारणांमुळे अंगाला तेलाची मालिश आवश्यक असते. पावसाळ्यात अंगाला  तिळाच्या नव्हे तर खोबऱ्याच्या तेलाच्या मालिशची (coconut oil massage) आवश्यकता असते.

Image: Google

पावसाळ्यात खोबऱ्याच्या तेलानं मालिश का?

पावसाळ्यातल्या कुंद वातावरणामुळे शरीर जडावतं, दुखतं. आळस येतो. या काळात शरीरातील ऊर्जा वाढवणं आणि टिकवणं महत्वाचं असतं. अंगाला खोबऱ्याच्या तेलानं मालिश केल्यास ऊर्जा निर्माण होते. खोबऱ्याच्या तेलानं त्वचेचा संसर्ग दूर होतात. स्नायू लवचिक होतात. जडावलेल्या, दुखणाऱ्या शरीराला आराम मिळतो. स्नायू दुखी कमी होवून स्नायुंना ताकद मिळते.

Image: Google

खोबऱ्याच्या तेलानं मालिश करण्याचे फायदे

1. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता अधिक असते. यामुळे त्वचा तेलकट राहाते. यामुळे त्वचेला जिवाणू आणि बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका असतो. खोबऱ्याच्या तेलात जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. खोबऱ्याच्या तेलानं त्वचेची रंध्रं जिवाणुमुक्त होतात. 

2. खोबऱ्याचं तेल त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यास मदत करतं. पावसाळ्यात बऱ्याचदा ओलं झाल्यामुळे अंग दुखतं. ही अंगदुखी खोबऱ्याच्या तेलाच्या मालिशनं बरी होते. यासाठी घाण्याचं खोबऱ्याचं तेल वापरावं.

3. खोबऱ्याच्या तेलात फॅटी ॲसिड , लाॅरिक ॲसिड असतं. या ॲसिडमध्ये जिवाणूविरोधी, सूक्ष्म जीव विरोधी गुणधर्म असल्यानं त्वचेचं पावसाळ्यातल्या घातक जिवाणुंपासून रक्षण होतं. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या लिनोलिक ॲसिडमुळे शरीरात नैसर्गिक माॅइश्चर निर्माण होतं. 

4. आंघोळीच्या आधी खोबऱ्याच्या तेलानं मालिश केल्यास तेलातील पोषक गुणधर्म त्वचेत नीट शोषले जातात. त्वचेवरची रंध्रं मोकळी होतात त्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. 

5. त्वचा मऊ मुलायम करण्याची क्षमता खोबऱ्याच्या तेलातील गुणधर्मात असते. खोबऱ्याच्या तेलामुळे त्वचेच्या कोरडेपणाची, त्वचेला खाज येण्याची समस्या दूर होते. 

केसांनाही हवा खोबऱ्याच्या तेलाचा मसाज

पावसाळ्यातल्या वातावरणाचा त्वचेसोबतच केसांवरही परिणाम होतो. वातावरणातील आर्द्रतेमुळे टाळूची त्वचा रुक्ष होते. खाज येणे, कोंडा होणे या समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात आर्द्र वातावरणामुळे येणारा घाम यामुळे  केसांच्या मुळाशी असलेलं नैसर्गिक तेल कमी होतं. यामुळे केस कमजोर होवून गळतात. यासाठी पावसाळ्याच्या दिवसात आठवड्यातून दोन वेला केसांच्या मुळांशी खोबऱ्याच्या तेलानं मसाज करणं आवश्यक आहे. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या ॲण्टिऑक्सिडस्ण्टस आणि फॅटी ॲसिडमुळे टाळूच्या पेशींचं पोषण होतं.  खोबऱ्या तेलानं केसांना मसाज केल्यानं केसातील कोंडा कमी होतो. केसातला रुक्षपणा दूर होतो. केसांना नियमित खोबऱ्याच्या तेलानं मसाज केल्यास केस वाढण्यासही त्याचा फायदा होतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी