दिवाळी तोंडावर आहे आणि कामं एकामागोमाग उभी आहेत. कामांच्या मागे धावतांना विशेष काही जाणवत नाही. पण जेव्हा कामं संपवून पाठ टेकायची वेळ येते तेव्हा शरीराला आणि मनाला आलेला थकवा अस्वस्थ करतो. कामामुळे केवळ शरीरच थकतं असं नाही तर मन आणि आपली त्वचाही तितकीच थकते. हा थकवा घालवण्याचा आणि शरीरासोबत मनाला आराम देण्याचा , आपल्या त्वचेचे लाड पुरवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे मसाज. पार्लरमधे जाऊन चेहेर्याचा किंवा शरीराचा मसाज करायचा असेल तर काही प्रश्न नसतो पण चेहेर्याचा घरच्या घरी मसाज करायचा आहे म्हटलं की प्रश्न पडतो की, मसाजसाठी कोणतं तेल वापरावं? मसाजसाठी तेलाचा पर्याय शोधताना आपल्याकडे असलेल्या खोबर्याच्या तेलाचा मात्र आपल्याला विसर पडतो. सौंदर्यतज्ज्ञ सांगतात की , मसाज चेहेर्याचा असू देत की संपूर्ण शरीराचा खोबर्याचं तेल हा उत्तम पर्याय आहे. अगदी ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा तेलकट आहे त्यांनीही मसाजसाठी खोबर्याचं तेल वापरलं तर त्याचा फायदाच मिळेल.
Image: Google
खोबर्याचं तेल इतर तेलांच्या तुलनेत खूपच हलकं असतं, त्याचा पोत खूपच मऊ असतो अणि त्वचेत ते पटकन शोषलं जातं. त्यामुळे सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात मसाजसाठी डोळे झाकून खोबर्याचं तेल वापरावं. कामामुळे आलेला थकवा चेहेर्यावरही स्पष्ट दिसतो. चेहेर्याची त्वचा ओढल्यासारखी होते, हिवाळ्यात तर कोरड्या वातावरणाचा परिणाम होवून ती आणखीनच शुष्क दिसते. अशा वेळी खोबर्याचं तेल त्वचेवर जादूसारखं काम करतं. थोड्या वेळ खोबर्याच्या तेलानं चेहेर्याचा आणि शरीराचा मसाज केल्यास त्वचा मऊ होते, चेहेर्यावरचा आणि शरीरावरचा ताण मोकळा होतो. एवढंच नाहीतर खोबर्याच्या तेलानं मसाज केल्यास त्वचेसंबंधी इतर काही समस्या असतील तर त्याही दूर होतात.
Image: Google
मसाजसाठी खोबर्याचं तेल वापरताना..
1. मसाजसाठी खोबर्याचं तेल वापरताना तीन पध्दतींचा उपयोग करता येतो. खोबर्याच्या तेलात नैसर्गिक मॉश्चराइजरचे गुण असतात. या तेलानं चेहेर्याचा मसाज केल्यानं त्वचा घट्ट होते, शिवाय चेहेर्यावरच्या सुरकुत्याही जातात. हा परिणाम मिळवण्यासाठी दोन ते तीन चमचे खोबर्याचं तेल घ्यावं. ते थोडं कोमट करावं. मग त्यात एक चमचा गुलाब पाणी मिसळावं. आणि हे मिश्रण चेहेरा, मान , हात, पाय यांना लावत पाच ते दहा मिनिटं मसाज करावा. चेहेर्यावर मसाज करताना बोटं गोल गोल फिरवत करावा. मसाज झाला की एक तास थांबावं आणि मग चेहेरा गार पाण्यानं धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून घेतला की चेहेर्याला वाफ घ्यावी. वाफ घेऊन झाल्यावर 10-15 मिनिटं थांबावं आणि मग चेहेरा पुन्हा पाण्यानं धुवावा. आठवड्यातून एकदा हा मसाज केल्यास त्वचा मऊ आणि तुकतुकीत होते.
2. संपूर्ण शरीराचा मसाज करायचा असला तरी केवळ खोबर्याचं तेल कोमट करुन वापरलं तरी चालतं. किंवा त्यात थोडं इसेंन्शिअल ऑइलचे काही थेंबही टाकता येतात. खोबर्याचं तेल अंगाला मसाज करत लावल्यानंतर थोडा वेळ कोवळ्या उन्हात जावं. यामुळे आराम मिळतो. फक्त कडक उन्हात मात्र जाऊ नये. पाठ-कंबर दुखत असल्यास खोबर्याचं तेल कोमट करुन लावलं की आराम मिळतो. संपूर्ण शरीराला खोबर्याच्या तेलानं मसाज केल्यावर एका तासानं आंघोळ करावी. यामुळे त्वचेला तेल शोषून घेण्यास वेळ मिळतो.
3. डोकं जड वाटत असल्यास खोबर्याच्या तेलानं केलेल्या मसाजमुळे सगळा ताण मिनिटात निघून जातो. वाटीत खोबर्याचं तेल घेऊन ते कोमट करावं. या कोमट तेलात बोटं बुडवून केसांच्या मुळांशी हलका मसाज करावा. यामुळे डोक्यावरचा ताण हलका होतो तसेच केसांनाही या मसाजचा खूप फायदा होतो. झोप उशिरा लागणं, झोप न येणं या समस्यांवरही डोक्याला खोबर्याच्या तेलाचा मसाज हा उत्तम उपाय आहे. यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा तरी खोबरेल तेलानं डोक्याला मसाज करायला हवा.
Image: Google
खोबरेल तेलाच्या मसाजचे फायदे
1. खोबर्याच्या तेलात जिवाणू विरोधी गुणधर्म असतात. तसेच या तेला जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. त्वचेसाठी फायदेशीर असलेले अँण्टिऑक्सिडण्ट असतात. खोबर्याच्या तेलानं मसाज केल्यास त्वचेचे संसर्गापासून रक्षण होतं.
2. दिवाळीच्या काळात आणि पुढे थंडीच्या हंगामात त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. केवळ चेहेर्याचीच त्वचा नाही तर पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होते. त्यासाठी खोबर्याचं तेल हलकं गरम करुन त्यानं पूर्ण शरीराचा मसाज केल्यास त्वचेचा शुष्कपणा जातो, त्वचा मऊ होते, त्वचेला पोषण मिळतं.
3. खोबर्याच्या तेलानं नियमित चेहेर्याला मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
4. थंडीत बर्याचदा उन्हात बसण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे छान वाटत असलं तरी सूर्याच्या अति नील किरणांचा त्वचेवर दुष्परिणाम होऊन त्वचा आणखी शुष्क होते. यामुळे त्वचेचा रंग आणि चमक नाहीशी होते. हे परत मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे खोबर्याच्या तेलानं नियमित मसाज.
5. खोबर्याच्या तेलानं त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते आणि रंगही उजळतो.