आजच्या काळात केस गळणं ही एक सामान्य पण अत्यंत त्रासदायक समस्या बनली आहे. पूर्वी केस गळतीचा संबंध वय किंवा बदलत्या हवामानाशी जोडला जायचा, परंतु आता अगदी कमी वयातच लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेकदा आपण फक्त शॅम्पू बदलणं किंवा तेल लावणं एवढ्यापुरताच याचा विचार करतो, पण वास्तव त्यापेक्षा खूप वेगळं आहे.
केस गळण्यामागे आपल्या रोजच्या सवयी, मानसिक स्थिती आणि आपण वापरत असलेली उत्पादनं यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे केस गळण्यामागची खरी कारणं समजून घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते जर वेळेत या कारणांकडे लक्ष दिलं, तर केवळ केस गळणं थांबवता येत नाही, तर केस पुन्हा मजबूत आणि निरोगी बनवता येतात. केस गळण्याची ४ मुख्य कारणं आणि ती कशी रोखता येईल, हे जाणून घेणार आहोत.
स्ट्रेस आणि हाय कॉर्टिसोल
न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांच्या मते, केस गळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्ट्रेस. जेव्हा तुम्ही जास्त स्ट्रेस घेता, तेव्हा शरीरात 'कॉर्टिसोल' हार्मोनची लेव्हल वाढते. यामुळे केसांची वाढ खुंटते आणि केस वेगाने गळू लागतात. दीर्घकाळ स्ट्रेसखाली राहिल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला केस गळती थांबवायची असेल, तर आधी स्ट्रेस फ्री होणं गरजेचं आहे.
पोषणाची कमतरता
निरोगी केसांसाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते, जसं की आयर्न, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि प्रोटीन. अनेकदा आपल्या शरीरात या पोषक तत्वांची कमतरता असते आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते. अशा परिस्थितीत शरीर इतर महत्त्वाच्या अवयवांना प्राधान्य देते आणि केसांकडे होणारा पोषक तत्वांचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे केस गळू लागतात.
गट हेल्थ खराब
पचनशक्ती किंवा 'गट हेल्थ' बिघडणं म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देणं होय. यात केस गळतीचाही समावेश आहे. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल आणि आतड्यांमधील संतुलन बिघडलं असेल तर शरीर अन्नातील आवश्यक पोषक तत्व शोषून घेऊ शकत नाही. याचा थेट परिणाम केसांवर होतो, ज्यामुळे ते कमकुवत आणि निर्जीव होतात.
केमिकल्सचा अतिवापर
आजकाल केस सुंदर दिसण्यासाठी केमिकल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे तात्पुरते केस चांगले दाखवत असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम घातक असतात. वारंवार हेअर कलर करणं, हीटिंग टूल्सचा वापर आणि हार्श शॅम्पू केसांचं नुकसान करतात. यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन तुटायला लागतात.
