Join us

कढीपत्त्याच्या पानांचं तेल भसाभस लावलं तर केस गळणं थांबतं, कोंडा जातो? डॉक्टर म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:13 IST

Curry Leaves Oil For Hair: कढीपत्त्याचे शेकडो उपाय व्हायरल असतात, पण त्यानं खरंच फरक पडतो का?

Curry Leaves Oil For Hair: केसांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक एक्सपर्ट वेगवेगळे उपाय सांगतात. बरेच लोक हे उपाय फॉलोही करतात. यातीलच एक उपाय म्हणजे कढीपत्ता. केसगळतीची समस्या आजकाल खूप जास्त वाढली आहे. महिला असो वा पुरूष कमी वयातच खूप जास्त केस जातात. खाण्यात पोषणाची कमतरता, चुकीच्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर, केसांची योग्य काळजी न घेणे या गोष्टी केसगळतीला कारणीभूत ठरतात. अशात केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी कढीपत्ता रामबाण उपाय ठरू शकतो.

कढीपत्त्याचं तेल केसांसाठी फायदेशीर मानलं जातं. पण खरंच कढीपत्त्याच्या तेलानं केसगळती कमी होते का? याचाच खुलासा डॉ. महेंद्र लालवानी यांनी Onlymyhealth सोबत बोलताना केला आहे.

कढीपत्त्याच्या तेलानं खरंच फायदा होतो?

एक्सपर्ट सांगतात की, कढीपत्त्याचं तेल लावल्यानं केसगळती कमी होऊ शकते. यासाठी रोज कढीपत्त्याचं तेल लावावं लागेल. पण केवळ कढीपत्त्याचं तेल लावून केसगळती थांबेल असं वाटत असेल तर आपण चुकताय. कारण ही समस्या दूर करण्यासाठी योग्य आहार आणि केसांची काळजी घेणं हेही तेवढंच महत्वाचं ठरतं.कढीपत्त्याच्या तेलाचे फायदे

केसांचं आरोग्य सुधारतं

कढीपत्त्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स, अमिनो अ‍ॅसिड आणि बीटा-कॅरोटीन भरपूर असतं. जे डोक्याच्या त्वचेला पोषण देतं. या पोषक तत्वांनी केसांचे मूळ मजबूत होतात आणि एकंदर केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते. याचा परिणाम असा होतो की, केस मजबूत होतात आणि सहजपणे तुटत नाहीत.

कोंडा, ड्रायनेस कमी होईल

कढीपत्त्याच्या तेलानं डोक्याच्या त्वचेला भरपूर पोषण मिळतं. त्वचा मॉइश्चराइज होते, ज्यामुळे कोंडा, ड्रायनेस कमी होतो. ही केसगळतीची मुख्य कारणं असतात. डोक्याची त्वचा मॉइश्चराइज राहिल्यास नवीन केस येण्यास मदत मिळते. यानं हेअर फॉलिकल्स मजबूत होतात आणि केसगळती कमी होते.

ऑक्सीडेटिव स्ट्रेसमुळे वेळेआधीच केस पातळ होतात. अशात कढीपत्त्याचं तेल लावल्यानं ही समस्या कमी होते. यातील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्सनं ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी होतो आणि याचा केसांना फायदा मिळतो.

केसांची वाढ

केसांची वाढ होण्यासाठी कढीपत्त्याचं तेल फायदेशीर ठरू शकतं. तसेच केस तुटणंही कमी होतं. पण याचा प्रभाव प्रत्येक व्यक्ती आणि केसगळतीची कारणं यानुसार वेगवेगळा असू शकतो.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स