Join us  

#Breakthebias : 'मी सुंदर नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?' - तापसी पंन्नूचा सौंदर्याच्या ठेकेदाराना थेट सवाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 3:29 PM

#Breakthebias - सौंदर्याची कोणतीही एक व्याख्या करु शकत नाही, तसेच तुम्ही सौंदर्य हे कोणत्याही एका साचात बसवू शकत नाही असे सांगत तापसी म्हणते

ठळक मुद्देएकदा मी स्वत:ला आणि माझ्या कुरळ्या केसांना स्वीकारायचे ठरवले आणि मी माझ्या केसांवर मनापासून प्रेम करायला लागलेआपण सगळ्यांनी मिळून सौंदर्याची ठराविक एक चौकट मोडण्याची गरज आहे

सुंदरतेची व्याख्या ही प्रत्येकानुसार बदलते. पण साधारणपणे सरळ सिल्की केस, धारधार नाक, नाजूक टोकदार डोळे आणि बारीक असाल आणि सर्वात महत्त्वाचे तुमचा रंग गोरा असेल तरच एखादी स्त्री सुंदर असे मानले जाते. एरवी नाही पण मनोरंजन क्षेत्रात आणि लग्नाच्या वेळी तरी सौंदर्याचे हे सगळे निकष मुलींच्या बाबतीत आवर्जून लावले जातात. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने नुकतेच एका मुलाखतीत आपले याबाबतचे मत व्यक्त केले आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर एकाहून एक उत्तम भूमिका असलेले चित्रपट करणारी तापसी म्हणते, तुम्ही सौंदर्याची कोणतीही एक व्याख्या करु शकत नाही, तसेच तुम्ही सौंदर्य हे कोणत्याही एका साचात बसवू शकत नाही (#Breakthebias ). इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तिने याविषयी भाष्य केले. (#ब्रेकदबायस)

(Image : Google)

खूप कुरळे केस असणारी तापसी आपल्या या कुरळ्या केसांवर मनापासून प्रेम करत असल्याचे सांगते. ती म्हणते, “आपण सगळ्यांनी मिळून सौंदर्याची ठराविक एक चौकट मोडण्याची गरज आहे. उंच, गोऱ्या, सरळ केस असणाऱ्या मुलीच दिसायला सुंदर असतात असे आपल्या मनावर बिंबवले गेले आहे, तसे केल्यास आपल्यातील बहुतांश जणी सौंदर्याच्या व्याख्येत बसणारच नाहीत. पण तसे नसते, आपल्याला नैसर्गिकरित्या जे सौंदर्य मिळाले आहे ते जपणे आणि त्यावर प्रेम करणे आवश्यक आहे.” आपल्या कुरळ्या केसांवर मनापासून प्रेम कऱणारी तापसी म्हणते, माझे कुरळे केस ही माझी ओळख आहे आणि ते मी अतिशय अभिमानाने एखाद्या मुकुटाप्रमाणे मिरवते. 

(Image : Google)

आपल्याला जसे कळायला लागले तसे १२ वी नंतर मी माझ्या कुरळ्या केसांवर अनेक प्रयोग केल्याचे तापसी सांगते. कधी स्ट्रेटनिंग करुन तर कधी त्यांना कलर करुन मी माझे रुप बदलण्याचा प्रयत्न करत होते. पण हळूहळू मला माझ्या केसांचे महत्त्व कळल्यावर त्यांनीही नकळतपणे माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केले असेही तापसी सांगते. सुरुवातीला माझे माझ्या केसांसोबत लव्ह-हेट रिलेशनशीप होते असे तापसी म्हणते. सौंदर्याच्या व्याख्येत बसण्यासाठी आपण आपल्या केसांवर अनेकदा काही उपचार केले. पण हे सगळे तात्पुरते असून तुम्हाला कायम सुंदर राहायचे असेल तर तुम्हाला स्वत:ला आहात तसे स्वीकारणे गरजेचे आहे. एकदा मी स्वत:ला आणि माझ्या कुरळ्या केसांना स्वीकारायचे ठरवले आणि मी माझ्या केसांवर मनापासून प्रेम करायला लागले. मग हे कुरळे केस चमकदार राहण्यासाठी काय करायचे, ते जसे आहेत तसेच आणखी छान होण्यासाठी काय करायचे या गोष्टी मी समजून घेतल्या आणि त्यादृष्टीने त्यावर काम करायला सुरुवात केली असे तापसी आवर्जून सांगते. 

टॅग्स :जागतिक महिला दिनतापसी पन्नूब्यूटी टिप्स