चेहर्यासाठी आपण विविध ट्रिटमेंट्स घेतो. चेहऱ्याची छान काळजी घेतो. मात्र फक्त चेहरा नाही तर संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. बारकाईने पाहीले तर शरीरावर बारीक पुरळ दिसते. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. लहानच आहे म्हणून सोडून देतो. मात्र आरोग्यासाठी ते चांगले नाही. अनेक वेळा लहान, लालसर किंवा पांढरट पुरळ शरीरावर असते. अशा प्रकारची पुरळ वेगवेगळ्या कारणामुळे येते. घाम, धूळ, उष्णता आणि त्वचेची छिद्रे बंद होणे ही सामान्य कारणे असतात. (Body acne , rashes and skin problems, small problems can turn into big skin diseases )चुकीचे अन्न पदार्थ खाल्यामुळे त्वचेवर पुरळ येते. तेलकट, उघड्यावरचे अन्न कधीच खाऊ नका.तसेच विशिष्ट साबण किंवा लोशनचा वापर केल्यामुळे त्वचेवर पुरळ येते. बॅक्टेरिया किंवा फंगल संसर्गामुळे त्वचेला त्रास होतो. आपण कोणते कपडे घालतो याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. घट्ट कपडे घातल्यामुळे त्वचेवर असे पुरळ येते. त्यामुळे सैलसर, हवेशीर कपडे घालायचे.
या पुरळांवर घरच्या घरी काही साधे उपाय केले तरी चांगला आराम मिळू शकतो. त्वचा नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. घामोळ्यासारख्या पुरळांसाठी थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरते. कोरफडीचा रस त्वचेवर लावल्याने पुरळांमुळे येणारी खाज शांत होते आणि लालसरपणा कमी होतो. हळद अँण्टीसेप्टिक गुणांनी भरलेली असल्यामुळे दुधात हळद मिसळून ते पुरळावर लावल्यास त्वचेला आराम मिळतो. चंदन आणि गुलाबपाणी यांचा लेप त्वचेवरील उष्णतेचा त्रास कमी करून पुरळाचे प्रमाण कमी करते. तुळशीची पाने वाटून त्याचा लेप लावल्यास बॅक्टेरियल संसर्गावर प्रभावी परिणाम होतो. नारळ तेल लावल्यास त्वचेला पोषण मिळते आणि कोरडेपणामुळे होणार्या पुरळावर आराम मिळतो.
पुरळ वाढू नयेत यासाठी जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे. कडक गरम पाण्यामुळे पुरळ वाढते. लालसर दिसायला लागते. त्वचेला खाज सुटू नये यासाठी आयुर्वेदिक साबण वापरावा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले, विशेषतः जर पुरळ वाढत असेल आणि त्यातून पांढरा पस बाहेर येत असेल तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपाय केले नाही तर त्याचा परिणाम गंभीर होतो. त्वचारोग होण्याची शक्यता असते.