Join us

पांढरे केस काळे करण्यासाठी घरीच तयार 'हे' नॅचरल ऑइल, कोणतंही एक वापरा फरक दिसून येईलच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:43 IST

Hair Care Tips : काही तेलांबाबत आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. काही खास तेल घरीच तयार करून आपण पांढरे झालेले केस काळे करू शकता.

Hair Care Tips : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची आणि केसगळतीची समस्या होऊ लागली आहे. याची कारणेही वेगवेगळी असतात. त्यामुळे बरेच लोक भरपूर पैसे खर्च करून वेगवेगळे उपाय करतात. ज्याचा फायदा होतोच असं नाही. अशात नैसर्गिक उपायांनी तुम्ही केस काळे करू शकता. अशाच काही तेलांबाबत आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. काही खास तेल घरीच तयार करून आपण पांढरे झालेले केस काळे करू शकता.

1) आवळा पावडर आणि खोबऱ्याचं तेल

हे तेल केसाना नैसर्गिक रूपाने काळं करतं. हे तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये 4 चमचे खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्यात दोन चमचे आवळा पावडर टाका. हे मिश्रण गरम करा. 10 मिनिटानंतर तेल थोडं कोमट झाल्यावर केसांची मालिश करा आणि 2 तासांनी केस शाम्पूने धुवावे. या तेलाचा वापर आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा. 

2) कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल

कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची काही पाने टाकून गरम करा. हे तेल नंतर थंड करून एका बॉटलमध्ये टाका. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा आणि सकाळी उठल्यावर शाम्पूने केस धुवा. 

3) खोबऱ्याचं तेल आणि लिंबू

खोबऱ्याचं तेल गरम करून त्यात लिंबाचा रस टाका आणि या तेलाने डोक्याच्या त्वचेची हलक्या हाताने मालिश करा. सकाळी शाम्पूने केस धुवा. या उपायाने काही दिवसातच तुम्हाला फरक बघायला मिळेल.

4) मोहरीचं तेल आणि एरंडीचं तेल

एका वाटीमध्ये एक चमचा एरंडीचं तेल आणि दोन चमचे मोहरीचं तेल टाकून गरम करा. नंतर तेल नॉर्मल झाल्यावर केसांची मालिश करा. सकाळी उठून शॅम्पूने धुवावे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्याने केस नैसर्गिक रूपाने काळे होतील.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स