दिवाळीच्या आधी घरोघरी इतके मोठे स्वच्छता अभियान सुरु होते की, घर स्वच्छ करण्याच्या नादात घरातल्या महिलांचा मात्र अगदी अवतार होऊन जातो. दिवसभर साफसफाई करून, घासणं, पुसणं अशी कामं करुन करुन महिल्या बिचाऱ्या थकून जातात. या सगळ्या स्वच्छता अभियानात अतिशय महत्त्वाची भुमिका असते ती आपल्या दोन्ही हातांची. सगळं आवरून झाल्यावर घर जेवढं लख्ख, चकचकीत होऊन जातं, तेवढीच हातांची अवस्था वाईट झालेली असते. हात अतिशय कोरडे, खरखरीत झालेले असतात. नखं घाण होऊन जातात आणि बऱ्याचदा तर हात काळवंडतात. असे हात पाहून खूपच वाईट वाटतं.
हॅण्डग्लोज वापरून काम करणं हा एक उत्तम उपाय आहे. पण बरेचदा आपण साफसफाई करताना हॅण्डग्लोज घालणंच विसरुन जातो. बऱ्याचदा असं होतं की हॅण्डग्लोज घालून प्रत्येक काम करणं जमत नाही. त्यामुळे मग हॅण्डग्लोज काढून टाकले जातात आणि कामाला सुरुवात केली जाते. यामुळेच मग स्वच्छता मोहीम संपत आली की हातांची रया मात्र जाऊ लागते.
तुमच्या बाबतीतही असंच झालं असेल तर आता हातांची काळजी करणं सोडा आणि हे ५ उपाय करून बघा. हात पुर्वी जेवढे सुंदर होतील, त्यापेक्षाही अधिक सुरेख दिसू लागतील.
हाताचे सौंदर्य खुलविण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय
१. टोमॅटोचा रस
हातांचा रखरखीतपणा घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. एखाद्या मध्यम आकाराच्या टोमॅटोचा रस काढून घ्या. हा रस दोन्ही हातांवर ५ ते ७ मिनिटे चोळून चोळून लावा. यानंतर १५ ते २० मिनिटांनी हात स्वच्छ धुवून टाका. हाताचा काळेपणा या उपायाने दूर होईल.
२. मध आणि लिंबू
चार टेबलस्पून मध आणि चार टेबलस्पून लिंबू हे मिश्रण एकत्र करावे. दोन्ही हाता आधी थोडे ओले करून घ्यावेत आणि त्यानंतर हे मिश्रण हातांवर लावावे. लिंबाचे साल हातावर घासून हात स्वच्छ करावेत. यानंतर १० ते १५ मिनिटे हे मिश्रण हातावर तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर धुवून टाकावे.
३. मसूर डाळीचे पीठ आणि दूध
हाताचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी चार टेबलस्पून मसूर डाळीचे पीठ घ्या. यानंतर या पीठात कच्चे दूध घाला. पीठ अतिशय पातळ होईल, असे भिजवू नये. घट्ट पेस्ट होईल अशा पद्धतीने पीठ भिजवा आणि ही पेस्ट तुमच्या हातावर चोळा. या उपायामुळे हातावरची डेड स्किन निघून जाईल आणि हात मुलायम होतील.
४. रोज रात्री हातांना मसाज
दिवाळीची स्वच्छता झाल्यानंतर चार ते पाच दिवस दररोज रात्री हा उपाय न चुकता करावा. रात्री झोपताना हात स्वच्छ धुवून घ्यावेत. पुसून कोरडे करावेत आणि त्यानंतर खोबरेल तेल हातावर चोळून लावावे. खोबरेल तेलाने दोन्ही हातांची ५ ते १० मिनिटे मालिश करावी. यामुळे हातांमधले रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि हात चमकदार दिसू लागतात. तसेच तेलामुळे हात मुलायम होतात.
५. हातांना करा स्क्रब
दिवाळीला तर तुम्ही उटणे आणताच. यावर्षी उटण्याची दोन पाकिटे आणा. एक पाकीट दिवाळीला फोडा आणि एक पाकीट मात्र दिवाळीच्या आधीच तुमच्या हातांसाठी वापरा. उटणं आणि दूध यांची पेस्ट करा आणि ती हातांवर चोळून लावा. उटणं हे आपल्या हातांसाठी एक नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करेल आणि हाताची त्वचा उजळेल. उटण्याचं स्क्रब झाल्यानंतर हाताला मॉईश्चरायझर लावायला विसरू नका.