जास्वंद हे गणपतीचे अतिशय आवडणारे फुल. म्हणूनच तर गणेशोत्सवात जास्वंदाला विशेष मान असतो आणि त्याची मागणीही भलतीच वाढलेली असते. कधी- कधी असेही वाटते की एवढ्या सगळ्या फुलांमधून बाप्पाला नेमके जास्वंदच का बरं आवडत असावे? तुमच्याही मनात कधीतरी हा प्रश्न डोकावलाच असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे जास्वंदाची प्रचंड उपयुक्तता. जास्वंद अतिशय आरोग्यदायी तर आहेच पण ते सौंदर्य प्रदान करणारे फुल म्हणून ओळखले जाते. जास्वंदामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळेच केस आणि त्वचा यांच्यासाठी जास्वंद अतिशय पोषक आहे. म्हणूनच तर तुमच्या ब्यूटी केअरमध्ये जास्वंदाचा सहभाग अवश्य हवा.
जास्वंदाचे शास्त्रीय नाव Hibiscus rosa – Sinesis असून ती मुख्यत्वे आशिया खंडात आढळणारी सदाहरित वनस्पती आहे. अनेक पुजाविधींमध्ये, आयुर्वेदात औषधी म्हणून किंवा कलाकुसर करताना रंग म्हणून जास्वंदाचा उपयोग केला जातो. जास्वंदाला shoe flower किंवा chinese rose म्हणूनही ओळखले जाते.
सौंदर्यासाठी असा करा जास्वंदाचा उपयोग१. जास्वंदाचा फेसपॅकपिंपल्स येणे, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या किंवा त्वचा रूक्ष आणि कोरडी झाली असेल, तर या सगळ्यांवर तुम्ही एक उत्तम उपाय करू शकता. तो म्हणजे जास्वंदाचा फेसपॅक. जास्वंदाचा फेसपॅक करणे अतिशय सोपे आहे. यासाठी ८ ते १० जास्वंदाची ताजी फुले घ्या आणि त्यांची पेस्ट करा. यामध्ये १ चमचा तांदळाचे पीठ, ४ ते ५ थेंब व्हिटॅमिन ई ऑईल आणि १ चमचा दूध टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या आणि आता हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. लवकरच चेहरा तजेलदार होईल आणि पिंपल्स, सुरकुत्या अशा समस्याही दूर होतील.
२. जास्वंदाचे कंडिशनरजास्वंदाचे तेल तर तुम्ही ऐकले असेलच आता जास्वंदाचे कंडिशनर ट्राय करून बघा. हे कंडिशनर आपल्याला घरीच बनवायचे आहे. यासाठी एक मग पाणी घ्या. यामध्ये जास्वंदाच्या ५ ते ६ फुलांच्या पाकळ्या कुस्करून टाका. हे पाणी उकळायला ठेवा. पाणी १० ते १५ मिनिटे चांगले खळखळ उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि पाणी झाकून ठेव. हे पाणी कोमट झाले की या पाण्याने केस धुवा. किंवा शाम्पू केल्यावर आपण ज्याप्रमाणे केसांना कंडिशनर लावतो, तसे हे पाणी लावा. केस मऊ, चमकदार आणि सिल्की होतील.
३. जास्वंदाचे तेलजास्वंदाच्या तेलाचे फायदे आपण अनेक ऐकलेले असतात. पण हे तेल नेमके कसे करायचे, हे माहिती नसते. म्हणूनच ही सोपी पद्धत घ्या आणि जास्वंदाचे तेल तयार करा. यासाठी साधारण पाव लीटर खोबरेल तेल घ्यावे. त्यात १० ते १५ जास्वंदाची फुले, दोन टेबलस्पून मेथी दाणे आणि वाटीभर कढीपत्त्याची पाने टाकावीत. हे तेल उकळून थंड करावे आणि नियमितपणे केसांना लावावे. केस दाट होतात आणि अकाली पांढरे होत नाहीत.
४. जास्वंदाच हेअरपॅकजास्वंदाच्या १० ते १५ फुलांच्या पाकळ्या तोडून घ्या. त्यांची कुटून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळांशी हळूवार हाताने लावा. दोन तासांनी शाम्पू करून केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केसगळती तर कमी होईलच पण केसांचा पोतही सुधारेल.