lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मुलींनाही टक्कल पडते का? केस फार गळतात तर दुर्लक्ष करू नका, कशावरून टक्कलच पडणार नाही?

मुलींनाही टक्कल पडते का? केस फार गळतात तर दुर्लक्ष करू नका, कशावरून टक्कलच पडणार नाही?

ऐन तारुण्यात टक्कल पडले की काय करु आणि काय नको होऊन जाते. सौंदर्यात अडथळा ठरणाऱ्या या टक्कल पडण्याला कोणती कारणे जबाबदार असतात, काय काळजी घ्यायला हवी याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 12:00 PM2021-10-24T12:00:02+5:302021-10-24T12:44:34+5:30

ऐन तारुण्यात टक्कल पडले की काय करु आणि काय नको होऊन जाते. सौंदर्यात अडथळा ठरणाऱ्या या टक्कल पडण्याला कोणती कारणे जबाबदार असतात, काय काळजी घ्यायला हवी याविषयी...

Bapare, bald in the thirties? 6 Reasons Why Girls Are Taklu | मुलींनाही टक्कल पडते का? केस फार गळतात तर दुर्लक्ष करू नका, कशावरून टक्कलच पडणार नाही?

मुलींनाही टक्कल पडते का? केस फार गळतात तर दुर्लक्ष करू नका, कशावरून टक्कलच पडणार नाही?

Highlightsटक्कल पडल्यामुळे सौंदर्यात बाधा येते काय आहेत कमी वयात टक्कल पडण्याची कारण योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्यास कमी होऊ शकते समस्या

आपले केस घनदाट, लांबसडक असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटते. मग हे केस वाढण्यासाठी एक ना अनेक उपाय केले जातात. कधी वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावणे तर कधी केस वाढावेत म्हणून काही ट्रीटमेंट घेणे अशा गोष्टी केल्या जातात. पण याचा उपयोग होतोच असे नाही. टक्कल हे केवळ मुलांना किंवा पुरुषांना पडते असा आपला समज असतो. पण हल्ली तरुण मुलींमध्येही २५ ते ३० वर्षाच्या वयातच केसगळती होते आणि टक्कल पडायला लागते. कधी हे टक्कल पुढच्या बाजूला असते. तर कधी केस विरळ होत जातात आणि केसांच्या मधे फटी दिसायला लागतात. ऐन तिशीत टक्कल पडल्यावर सौंदर्यात तर बाधा येतेच, अशावेळी नेमके काय करायचे हे कळत नाही. पण इतक्या लहान वयात केस गळण्याची नेमकी कारणे कोणती, त्यावर उपाय काय याबाबत माहिती घ्यायला हवी. हार्मोन्सचे असंतुलन, जीवनशैली आणि आहारातून पुरेसे पोषण न मिळणे ही केसगळतीची मुख्य कारणे असतात. तर केसांवर वेगवेगळे रासायनिक उपचार केल्यानेही केसगळती होऊन टक्कल पडू शकते. पाहूयात तरुणींमध्ये टक्कल पडण्याची नेमकी कारणे... 

१. हार्मोनचे असंतुलन - मुलींमध्ये हार्मोन्सचे असंतुलन असल्याने केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. यामध्ये थायरॉईड आणि पीसीओडी या दोन गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असतो. यातही इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ आणि टेस्टेस्ट्रॉनच्या पातळीत होणारी वाढ यामुळे केसगळती होऊ शकते. यामध्ये चेहऱ्याच्या हनुवटी, गाल, ओठांच्या वरच्या भागावर आणि शरीराच्या इतर भागातील केसांची वाढ होते आणि डोक्यावरील केस गळतात. 

२. आहारातून पुरेसे पोषण न मिळणे - केसांची चांगली वाढ होण्यासाठी चांगला, संतुलित आहार घेणे आवश्यक असते. यामध्ये लोह, व्हीटॅमिन बी, प्रथिने, व्हीटॅमिन बी १२ योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. मात्र सध्या मुली बरेचदा जंक फूड खातात. त्यामुळे त्यांना पुरेसे पोषक घटक मिळत नाहीत आणि केसांना पोषण न मिळाल्याने केस गळतात आणि टक्कल पडते. 

( Image : Google)
( Image : Google)

३. बाळंतपणानंतर केसगळती - बाळंतपणानंतर हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि मुलींमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढते. लोहाची कमतरता, अंगावर दूध पिणारे बाळ आणि अन्नातून पुरेसे पोषण न मिळणे यामुळे केसगळती होते.

४. संसर्गजन्य आजारानंतर केसगळती - कोरोना, डेंगी यांसारख्या आजारांतून बरे झालेल्या रुग्णांमध्ये २ ते ३ महिन्यांनी केसगळती सुरू झालेली दिसते. या आजारामध्ये घेतले जाणारे औषधोपचार आणि ताणतणाव यामुळे केस गळून टक्कल पडण्याची समस्या निर्माण होते. 

५. आनुवंशिकता - आई किंवा वडिल यांपैकी कोणाला खूप आधीपासून टक्कल असेल तर कमी वयात टक्कल पडण्याची समस्या मुलींमध्ये उद्भवू शकते. शरीरात तयार होणारे अँड्रोजेन हे संप्रेरक अशाप्रकारे टक्कल पडण्यास कारणीभूत असते. केसांच्या मूळावर या संप्रेरकाचा परिणाम होतो आणि मुळे कमकुवत होऊन केसांच्या जाडीवर त्याचा परिणाम होतो. परिणामी टक्कल दिसायला लागते. 

६. रासायनिक प्रक्रिया - हल्ली चांगले दिसण्यासाठी मुली सातत्याने केसांवर विविध उपचार करतात. यामध्ये ब्लो ड्राय, केरेटीन, स्ट्रेटनिंग यांसारख्या प्रक्रिया केल्या जातात. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे केस रुक्ष होतात आणि कालांतराने गळतात. 

( Image : Google)
( Image : Google)

याबाबत प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वैशाली किराणे म्हणाल्या,

हल्ली केस गळण्याचे किंवा कमी वयात टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बरेच जण आमच्याकडे उपचारांसाठी येतात. पण या समस्येला जीवनशैली हे मुख्य कारण असून चुकीचा आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे असतात. हार्मोन्समधील असंतुलन हेही केसगळती आणि टक्कल पडण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे तरुण मुलींनी आपला आहार, झोप, व्यायाम या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच गरज नसल्यास केवळ चांगले दिसण्यासाठी केसांवर रासायनिक प्रक्रिया करु नये, कारण त्यामुळेही केस गळतात आणि कमी वयात टक्कल पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. 

Web Title: Bapare, bald in the thirties? 6 Reasons Why Girls Are Taklu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.