Hair Care in Winter : थंडीला सुरूवात होताच केसांच्या वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. महिला असो वा पुरूष अनेकांना केसांमध्ये कोरडेपणा जाणवतो, अनेकांच्या केसांमध्ये कोंडा होतो. अशात या लोकांना केस गळणे अशा समस्या होतात. इतकंच नाही तर केसांची नॅचरल चमकही कमी होते. थंडीच्या दिवसांत शरीरातील वात दोष वाढतो, त्यामुळे केसांच्या रचनेवर त्याचा थेट परिणाम दिसून येतो.
मात्र हाच काळ असा असतो, जेव्हा शरीराची पचनशक्ती अधिक सक्षम होते आणि भरपूर पोषक आहार सहज पचतो. त्यामुळे हिवाळ्याचे हे दिवस केसांना आतून पोषण देण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. केसांचे आरोग्य फक्त बाहेरील उपचारांवर अवलंबून नसून, शरीरातील धातूंच्या पोषणावरही तेवढेच आधारलेले असते.
आयुर्वेदानुसार केस हे अस्थिधातूचे उपधातू मानले जातात. त्यामुळे केसांवर सीरम, मास्क किंवा तेल लावल्याने तात्पुरते सौंदर्य तर वाढते, पण केस मुळापासून मजबूत व्हावेत यासाठी रक्त, रस आणि अस्थिधातू यांचे पोषण योग्य असणे आवश्यक ठरते.
तूप आणि कोमट पाणी
दिवसाची सुरुवात एका साध्या पण प्रभावी पद्धतीने केली तर याचा केसांवर उत्तम परिणाम जाणवू शकतो. सकाळी एक चमचा तूप कोमट पाण्यासोबत घेतल्यास शरीरातील वाढलेला वात कमी होतो आणि केसांचा कोरडेपणा खूप कमी होतो.
तीळ आणि अळशीच्या बिया
याशिवाय हिवाळ्यात तीळ आणि अळशीच्या बिया शरीराला आवश्यक असे गुड फॅट्स आणि मिनरल्स देतात. नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी उपाशीपोटी या गोष्टी खाल्ल्यास केस मजबूत होतात आणि केसांच्या वाढीस मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दूधात दोन खजूर घेण्याची सवय केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते. याचबरोबर आवळा किंवा त्रिफळा चूर्णाचा नियमित वापर केल्यास केस आणि त्वचेचे आरोग्य दोन्ही सुधारते.
खोबऱ्याचं किंवा भृंगराज तेल
केसांना बाहेरून पोषण देण्यासाठी तेलांची भूमिका महत्त्वाची आहे. खोबऱ्याचं तेल, जटामांसी, भृंगराज किंवा स्वतःच्या आवडीचे कोणतेही तेल थोडेसे गरम करून टाळूपर्यंत लावल्यास ब्लड सर्कुलेशन सुधारतं. ताण कमी होतो, आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले फॉलिकल्स सक्रिय होतात. तेल लावल्यानंतर एक तासाने सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास त्याचा लाभ अधिक जाणवतो.
हिवाळ्यात अनेक जण दुर्लक्ष करतात पण आयुर्वेदातील छोटासा उपचार केसांच्या आरोग्यासाठी फार प्रभावी मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी नाकात दोन-दोन थेंब तुपाचे किंवा तिळाच्या तेलाचे टाकल्यास शरीरातील वात संतुलित होतो आणि केसांना थेट पोषण मिळते.
हे आयुर्वेदीक उपाय नेहमीच केले तर थंडीच्या दिवसात केसांमध्ये कोरडेपणा, तुटणं किंवा गळणं यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. केसांना बाहेरून चमक देणाऱ्या उत्पादनांपेक्षा शरीराला आतून बळ देणारा आहार आणि जीवनशैली अधिक परिणामकारक ठरते याचाच हा अनुभव.
