Hairfall Home Remedies : केसगळतीची समस्या पुरूष आणि महिलांमध्ये सारखीचे आहे. केसगळतीची समस्या सतत होत असेल तर टक्कर पडण्याची किंवा केस विरळ होण्याचा धोका असतो. मग ही समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. पण त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होतात. अशात काही घरगुती उपाय करून ही समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. असाच एक नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कांद्याचा रस फायदेशीर
कांद्याच्या रसामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असतं. जे केसांचे मूळ मजबूत करतं आणि ते तुटण्यापासून वाचवतं. त्याशिवाय कांद्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करतात. या तत्वांमुळं केसांमधील कोंडा, केस पांढरे होणे, डोक्याच्या त्वचेमध्ये खाज अशा समस्या दूर होतात.
कांद्यात काय मिक्स कराल
केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस आणि खोबऱ्याच्या तेलाचं मिश्रण खूप फायदेशीर ठरतं. खोबऱ्याच्या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करतात. यानं केसांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.
कसा कराल वापर
हा उपाय करण्यासाठी कांद्याचा रस काढा आणि त्यात 1 ते 2 चमचे खोबऱ्याचं तेल मिक्स करा. नंतर हे मिश्रण डोक्याची त्वचा आणि केसांवर चांगलं लावा. हे 30 ते 45 मिनिटं केसांवर चांगलं लावून ठेवा. त्यानंतर माइल्ड शाम्पूनं केस धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा.
कोरफडीचा गर मिक्स करा
कांद्याच्या रसामध्ये तुम्ही कोरफडीचा गरही मिक्स करू शकता. यानं केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. यातील अॅंटी-ऑक्टिसीडेंट्स केसांची वाढ करतात आणि डोक्याच्या त्वचेला हायड्रेट ठेवतात. यानं केस डॅमेज होणंही टाळलं जातं.
कसा कराल वापर?
हा उपाय करण्यासाठी कोरफडीचा 3 ते 4 चमचे गर कांद्यांच्या रसात मिक्स करा. हे मिश्रण डोक्याची त्वचा आणि केसांवर साधारण 30 ते 60 मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर माइल्ड शाम्पूनं केस धुवून घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करावा.