Hair Fall Home Remedies : वाढतं, प्रदूषण, खाण्यातून पोषणाची कमतरता, केमिकल्सचा वापर, वेगवेगळे आजार. योग्य काळजी न घेणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या केसगळतीमुळे आज महिला वैतागलेल्या आहेत. थोड्या प्रमाणात केस गळत असतील तर ठीक, पण जर केस गळून गळून विरळ झाले असतील किंवा छोटे झाले असतील तर ही खरंच चिंतेची बाब आहे. अशात ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळी औषधं, केमिकल्स उपलब्ध आहेत. पण यांचा वापर न करता काही असेही घरगुती आणि नॅचरल उपाय आहेत ज्यांचा वापर खूप आधीपासून केसगळती रोखण्यासाठी केला जातो. त्याच उपायांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला या उपायांसाठी जास्त खर्चही करावा लागणार नाही.
१) कांद्याचा रस
कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्यानं केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते. या रसामुळे डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि केसांची वाढही वेगानं होते.
कसा कराल वापर?
एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा. रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवा व ते सुकू द्या. आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा.
२) खोबऱ्याचं तेल
केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी खोबऱ्याचं तेल अतिशय उपयुक्त आहे. खोबऱ्यातील उपयुक्त मेद ,प्रोटीन्स व मिनरल्स यांमुळे केसांचं तुटण्याचं प्रमाण कमी होतं. केसगळती रोखण्यासाठी नारळाचं दूध वा तेल अतिशय उपयुक्त ठरतं.
कसा कराल वापर?
खोबऱ्याचं तेल गरम करून घ्या व केसांच्या मूळापासून टोकापर्यंत लावा. तासाभराने केस धुऊन टाका. दुसरा उपाय म्हणजे खोबरं किसून त्याचं दूध काढून ते टाळूवर केसगळतीच्या जागेवर लावा. रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.
३) लसूण
कांद्याप्रमाणेच लसणामध्येही ‘सल्फर’चे घटक असतात. म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचं प्रामुख्यानं आढळून येतं.
कसा कराल वापर?
लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या. त्यात खोबऱ्याचं तेल घालून मिश्रण गरम करा. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा. ३० मिनिटं तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका. असे आठवड्यातून दोनदा करा.
४) जास्वंद
जास्वंदाची फुलं केसांना पोषण देतात, केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात. केसगळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हे जास्वंदाचा हेअर पॅक्स बनवू शकता.
कसा कराल वापर?
काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. नंतर थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.
५) आवळा
केसगळतीने त्रस्त असलेल्यांसाठी आवळा नक्कीच चांगलाच फायद्याचा ठरतो. त्यातील व्हिटामिन सी व अॅंन्टी-ऑक्सिडेन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवतात.
कसा कराल वापर?
आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. केस कोमट पाण्याने धुऊन टाका. तुम्ही केसांची आवळ्याच्या तेलानं मालिशही करू शकता.