फटाके फोडताय, तर जरा जपूनच... काळजी घेणे गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 09:36 AM2022-10-23T09:36:17+5:302022-10-23T09:46:38+5:30

firecracker : फटाके वाजविताना स्वतःला आणि इतरांना कोणती इजा होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबई : दिवाळीचा सण म्हटलं म्हणजे साहजिकच फटाके आलेच. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्याची आतषबाजी केली जाते. यामध्ये मोठ्यांपासून लहान मुलांमध्ये फटाक्यांना घेऊन मोठा उत्साह असतो. मात्र फटाके फोडत असताना योग्य ती काळजी न घेतल्यास त्याचा आरोग्यास त्रास होऊ शकतो. फटाके वाजविताना स्वतःला आणि इतरांना कोणती इजा होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

फटाक्यांचे बाजारात विविध प्रकार पाहायला सध्या मिळत आहे. काही फटाके मोठ्या आवाजाचे, तर काही आवाज न करता मोठ्या प्रमाणात त्याचा आकाशात प्रकाश निर्माण होणार फटाके असतात, तर काही रंगीबेरंगी फुलबाजा असतात. त्यात धुराचे प्रमाण हे अधिक असते.

हे फटाके वाजवताना काहीवेळा भाजण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. दरवर्षी अशा काही अप्रिय घटना घडून लोकांना उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते. तसेच काहीवेळा हा फटाक्याचा धूर डोळ्यात जाऊन डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे फटाके वाजवताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

1) फटाके फुटताना भाजले तर शक्यतो वैद्यकीय सल्ला घ्यावा. 2) जखमेच्या तीव्रतेवर प्रसंग पाहून तत्काळ निर्णय घ्यावा. 3) घरी उपचार करत बसण्यापेक्षा डॉक्टरांचा एकदा दाखविलेले उत्तम आहे. 4) घरगुती उपचारानंतर काही वेळेस अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

1) फटाके फोडताना शक्यतो मोकळ्या परिसरात फोडावेत. रॉकेट किंवा अन्य आकाशात उडणारे फटाके इमारतीतील इतर कुणाच्या घरात जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

2) हौसिंग सोसायटीमध्ये मोठ्या आवाजाचे फटाके लावू नयेत, त्यामुळे आवाज घुमतो आणि विनाकारण त्याचा लोकांना त्रास होतो. तसेच सुती कपडे घालावेत. लहान मुले फटाके फोडत असताना शक्यतो थोरा-मोठ्यांनी त्यांच्यावर लक्ष द्यावे. कुठल्याही वाहनाजवळ फटाके वाजवू नयेत.

पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक फटाके घेण्यासाठी येतील. मात्र किरकोळ व्यवसाय वगळता अजून तरी म्हणावा तसा व्यवसाय झालेला नाही. आवाजाचे फटाके आणि आकाशातील फटाके यांना यापूर्वीही मागणी होती. त्या स्वरूपाचे फटाके आणून ठेवले आहेत. येत्या काही दिवसांत कशा पद्धतीने व्यवसाय होईल आता सांगणे मुश्कील आहे, असे फटाक्यांचे व्यापारी संजय आव्हाड यांनी सांगितले.