हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:02 IST2025-07-15T08:56:17+5:302025-07-15T09:02:56+5:30

Mumbai Local Accident Death: मुंबई लोकलमधून प्रवास करताना अनेकांनी प्राण गमावले. आठ वर्षात आठ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला. पण, कारणे काय?

काही महिन्यांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक अपघात घडला, ज्यात काही लोकांचा मृत्यू झाला. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात आहे. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मध्य रेल्वेने मृतांची आकडेवारी दिली.

रेल्वे उच्च न्यायालयाला सांगितले की, २०२५ या वर्षातील पहिल्या पाच महिन्यातच वेगवेगळ्या कारणाने ४४३ लोकांचा मृत्यू झाला.

मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, २०१८ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना लोकलसमोर येऊन १०२२ लोकांचा मृत्यू झाला. याच वर्षात लोकलमधून पडून ४८२ लोकांचा प्रवाशांचा मृत्यू झाला.

मध्य रेल्वेच्या वकील अनामिका मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या या शपथपत्रात सांगण्यात आले की, २०१९ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना ९२० लोकांचा मृत्यू झाला, तर लोकल रेल्वेतून पडून ४२६ लोकांनी जीव गमावला.

वर्ष २०२० मध्येही रेल्वे रुळ पार करताना लोकल रेल्वेसमोर येऊन ४७१ लोक ठार झाले. तर लोकलमधून प्रवास करताना खाली पडून १३४ लोकांचा मृत्यू झाला.

वर्ष २०२१ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेल्यांची संख्या ७४८, तर लोकलमधून प्रवास करताना खाली पडून मृत्यू झालेल्यांची संख्या १८९ इतकी होती. २०२२ मध्ये ६५४ लोकांचा मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना झाला, तर ५१० जण लोकल रेल्वेतून पडून मेले.

२०२३ मध्येही रेल्वे रुळ ओलांडताना ७८२ जण मरण पावले, तर ४३१ प्रवासी लोकल रेल्वेतून प्रवास करताना खाली पडून मरण पावले. २०२४ मध्येही ६७४ रेल्वे रुळ ओलांडताना मरण पावले आणि ३८७ प्रवासी लोकलमधून पडून मेले.