ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:14 IST2025-12-24T14:08:31+5:302025-12-24T14:14:56+5:30
Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Alliance News: अखेर मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली. यावेळी ठाकरे बंधूंनी कोणती भूमिका मांडली? पाहा, एका क्लिकवर...

Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Alliance News: अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आता मुंबई मनपा निवडणूक युतीत लढणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई मनपा निवडणुकीचे जागावाटप पूर्ण झाले आहे. लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.

अनेक भेटीगाठी, कौटुंबिक सोहळ्यांनंतर अखेर एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंनी युतीची अधिकृत घोषणा केली. या ऐतिहासिक पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण होणे स्वाभाविक आहे. मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापती मधले एक सेनापती होते. त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे, अख्खे ठाकरे घराणे मुंबईसाठी संघर्ष करत होता. त्याच्या नंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितली.

इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे पाहायला मिळत आहेत. दिल्लीत बसलेल्यांचे मनसुबे अनेक आहे. आता आपण भांडत राहिलो, तर त्यांना फायदा होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मागे म्हटले, तसे एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला आले तर त्याला सोडत नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा केली.

कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही. दोन टोळ्या वाढल्या आहेत, जे राजकीय पक्षातील मुले पळवतात. राज्यात सध्या दोन लहान मुले पळवण्याची टोळी आहे, अशी टोलेबाजी राज ठाकरे यांनी केली.

ज्याची प्रतीक्षा होती ती शिवसेना आणि मनसेची युती झाली हे मी जाहीर करतो. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही राज ठाकरे यांनी निक्षून सांगितले.

महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची ही युती आहे. आज केवळ महाराष्ट्र नाही तर अख्खा देश बघत आहे. विधानसभेवेळी भाजपाने अपप्रचार केला होता बटोगे तो कटोगे.. तसेच आता मी मराठी माणसांना आवाहन करतो की, आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

शिवसेनेला साधारण ६० वर्ष होत आली आहेत. आज आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावर कुणी वाकड्या नजरेने आणि कपटी कारस्थानाने मुंबईला मराठी माणसांपासून आणि महाराष्ट्रापासून वेगळे करणाऱ्यांचा खात्मा करू ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या अधिकृत घोषणेनंतर भाजपाने टीका केली असून, काँग्रेसने शुभेच्छा दिल्या आहेत.

















