Mumbai Rain History: मुंबईत पावसाने खरंच कहर केला! १०० वर्षांनंतर पहिल्यांदाच पडला असा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:01 IST2025-05-28T12:55:02+5:302025-05-28T13:01:56+5:30

Mumbai Rains Update Today: नैऋत्य मोसमी पावसाने ज्या दिवशी मुंबईत पाऊल ठेवले, त्याच दिवशी तुफान पाऊस झाला. इतका की रस्ते पाण्याखाली गेले. लोकल सेवा ठप्प झाली आणि देशाच्या आर्थिक राजधानीची प्रचंड फजिती झाली.

नेहमीच्या वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईला तडाखा दिला. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भागांची अवस्था कालव्यांसारखी झाली. पण, हवामान विभागाकडील नोंदीनुसार शंभर वर्षांनंतर मे महिन्यात इतका पाऊस पडला.

२६ मे रोजी मुंबईत पावसाने कहर केला. हवामान विभागाकडील नोंदींनुसार मे महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी मे महिन्यात मुंबईत इतका पाऊस १०७ वर्षांपूर्वी पडला होता.

मुंबईत इतका प्रचंड पाऊस झाला म्हणजे किती झाला? तर मे महिनाभराचा पाऊस मुंबईत २४ तासांतच पडला. कुलाबा वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार २६ मे रोजी मुंबईत २९५ मिलीमिटर पाऊस झाला.

मुंबईत एकाच दिवसात इतका पाऊस १९१८ मध्ये पडला होता. मे १९१८ मध्ये मुंबईत २७९ मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यापेक्षा अधिक पाऊस यावेळी मुंबईत मे महिन्यात झाला.

कुलाबा वेधशाळेच्या नोंदीनुसार तौक्ते चक्रीवादळ आले, त्यावेळीही मुंबईत इतका पाऊस झाला नव्हता. मे २०२१ मध्ये मुंबईत २५७.८ मिलीमिटर इतका पाऊस पडला होता.

२६ मे २०२५ रोजी मुंबईत पडलेल्या पावसाने मे १९१८ मध्ये पडलेल्या पावसाचा रेकॉर्ड मोडला. तब्बल १०७ वर्षानंतर हे घडले आहे.

दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वर्षानंतर मान्सून मुंबईत निर्धारित वेळेआधी आला आहे. हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले की, यापूर्वी २९ मे १९५६ मध्ये मान्सून मुंबईत निर्धारित वेळेआधी आला होता. मान्सून नेहमी ११ जूननंतर मुंबईत दाखल होतो. मे १९६२ आणि मे १९७१ मध्येही मान्सूनचे मुंबईत लवकर आगमन झाले होते.