Pooja Chavan Case: अज्ञात तरुणीने बोलावून पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल केला लंपास; पोलिसांकडून शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:19 AM2021-03-07T09:19:27+5:302021-03-07T09:31:14+5:30

Pooja Chavan Case: दिव्यांगाला एका अनोळख्या क्रमांकावरून फोन आला. तिने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असं सांगितलं.

बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या या आत्महत्येनंतर राज्यात राजकारण चांगलचं तापलं होतं.

शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला आहे.

भाजपच्या महिला आघाडीने या प्रकरणी राज्यभर आंदोलने केली.भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात बड्या मंत्र्याचे नाव आल्याने देशभरातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली होती.

मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘तुझ्या बहिणीबद्दल बोलयाचे आहे’ असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 04 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. पूजाची बहिण दिव्यांगा लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगा ही दहावीत शिकत आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते.

त्यावेळी दिव्यांगाला एका अनोळख्या क्रमांकावरून फोन आला. तिने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असं सांगितलं. त्यानंतर दिव्यांगा आणि सौरभ हे दोघे फाऊंडेशन शाळेजवळ पोहोचले. त्यावेळी अनोळख्या तरुणीने पुन्हा एकदा फोन करून दोघांना शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले.

दिव्यांगा फोनवर बोलत येत असताना समोरून आलेल्या अनोळख्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसाकवला आणि पळ काढला. सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. पण, काही अंतरावरच अनोळखी तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणीचा आम्ही शोध घेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.