Photos: पुनश्च तुंबापुरी... धुव्वाधार पावसामुळे रस्ते, गाड्या पाण्यात; तळं साचलं घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 12:37 PM2020-08-04T12:37:49+5:302020-08-04T13:20:08+5:30

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.

पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुढील 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत पावसाचा जोर पाहता मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. पालिकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. समुद्रात दुपारी 12.47 च्या सुमारास भरती येणार आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे" असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. रस्त्यांवर कंबरेएवढे पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे.

आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुसळदार पावसामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विरार ते अंधेरीपर्यतच सुरु आहे. तसेच मध्य रेल्वे धीम्या गतीने सुरु असून हार्बर रेल्वेची सेवा कुर्ला ते सीएसएमटी बंद असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचे नियोजन कोलमडून गेले आहे

मुंबईतील मिठी नदीच्या पाण्याची पातळी देखील आता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

वडाळा येथील चार रस्त्यावर देखील गुडघ्याभर पाणी साचले आहे.

मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत.

मुंबईत उपनगरातील कांदिवली भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी साचलं आहे.

पावसामुळे पाणी घरात पाण्याचं तळ साचलं आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच घरात पाणी गेल्यामुळे घरातील वस्तुचे नुकसान झाले आहे.