Mansukh Hiren: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर ते दोघं दिल्लीत फिरायला गेले; प्रवासाचा खर्च तिसऱ्याच व्यक्तीने केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 08:44 AM2021-06-29T08:44:34+5:302021-06-29T08:53:41+5:30

Mansukh Hiren: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ते मनसुख हिरेन हत्या या दोन प्रकरणांमुळे राज्याच्या पोलीस दलात आणि राजकारणात एकच खळबळ माजली होती.

अँटिलिया स्फोटक कार प्रकरण आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आनंद जाधव व संतोष शेलार या दोघांनाही १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर मनीष सोनी आणि सतीश मोटेकर यांच्या एनआयए कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती. हिरेन हत्येप्रकरणात शर्मा मास्टरमाइंड असल्याचा संशय एनआयएला असून पुरावे हाती लागल्यावर अटक केली. मात्र याचदरम्यान एक आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर संतोष शेलार व आनंद जाधव हे दिल्लीसह अन्य शहरांचा फेरफटका मारून आले होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात समोर आले आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी ही नवी माहिती समोर आली आहे. या गाडीचे मालक मनसुख हिरन यांची ४ मार्चला हत्या केल्यानंतर हे दोन आरोपी आधी दिल्लीला गेले.

दिल्लीजवळच्या अन्य शहरांतदेखील ते फिरले होते. या दोघांच्या मोबाइल फोन व इंटरनेट तपशिलावरुन ही माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या प्रवासाचा खर्च अन्य व्यक्तीने केला होता. ती व्यक्ती नेमकी कोण, याचा एनआयएकडून कसून तपास सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ते मनसुख हिरेन हत्या या दोन प्रकरणांमुळे राज्याच्या पोलीस दलात आणि राजकारणात एकच खळबळ माजली होती.

५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. त्यावेळी हिरेन यांचा चेहरा मंकी कॅपने झाकलेला होता तसेच त्यांच्या तोंडातून अनेक रुमाल बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा प्रथमदर्शनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. गेल्या काही महिनांपासून मनसुख हिरेन प्रकरणी तपास सुरु आहे. मात्र या प्रकरणातील गूढ अजूनही कायम आहे.