Sachin Vaze: 'त्या' पुराव्यांमुळे सचिन वाझे मगर'मिठी'त अडकले; ज्यामुळे नाव कमावलं, त्याचमुळे गमावणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 08:36 PM2021-03-28T20:36:45+5:302021-03-28T20:40:31+5:30

Sachin Vaze: सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात; भक्कम पुरावे सापडले

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारमुळे राज्यासह देशात खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांनाच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केल्यानं एकच खळबळ उडाली.

सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझेंनीच संपूर्ण कट रचल्याचा संशय एनआयएला होता. आता एनआयएचा संशय जवळपास पक्का झाला. सचिन वाझेंविरोधात दररोज एनआयएला भक्कम पुरावे आढळून येत आहेत. त्यामुळे वाझेंचा पाय आणखी खोलात गेला आहे.

सचिन वाझेंनी मोठ्या हुशारीनं अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याची योजना आखली. यामध्ये त्यांनी व्यवसायिक मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ कार वापरली. स्फोटकांनी भरलेली कार आढळून आल्यानंतर वातावरण स्फोटकं बनलं. त्यानंतर हिरेन यांचा मृतदेह आढळून आला.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. स्फोटक आणि हत्या प्रकरणात वाझेंनी तंत्रज्ञानाचा चतुराईनं वापर केला. मात्र आता त्याच तंत्रज्ञानाच्या आधारे एनआयएनं त्यांच्या भोवतीचा फास आवळला आहे.

टेक्नोसॅव्ही अधिकारी ही सचिन वाझेंची ओळख. तंत्रज्ञानाचा उत्तम अभ्यास असलेल्या वाझेंनी तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक गुन्ह्यांची उकल केली. मात्र आता याच तंत्रज्ञानामुळे त्यांचा पाय खोलात गेला आहे.

हिरेन यांची स्कॉर्पिओ कार वाझे वापरत होते. त्यांच्या सोसायटीच्या आवारात ही कार उभी असायची. संपूर्ण कटात सहभागी असलेले काही जण त्यांना भेटायला यायचे. त्यामुळे वाझेंनी त्यांच्या सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर (डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर) लांबवला.

सचिन वाझेंना एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांना मोबाईलबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा मोबाईल हरवल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अँटिलिया स्फोटकं आणि हिरेन हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले डीव्हीआर, लॅपटॉप, कॉम्प्युटर, हार्डडिस्क, प्रिंटर वाझेंनी मिठी नदीत फेकून दिले.

आज एनआयएची टीम वाझेंना वांद्रे कुर्ला संकुलातल्या मिठी नदी परिसरात घेऊन गेली. या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. वाझेंनी सांगितलेल्या ठिकाणी शोध मोहिम राबवली गेली आणि २ डीव्हीआर, १ लॅपटॉप, २ सीपीयू, १ हार्डडिस्क, १ प्रिंटर एनआयएच्या हाती लागला.

पाणबुड्यांनी मिठी नदीतून काढलेल्या इलेक्ट्रॉनिक ऐवजांमुळे अँटिलिया स्फोटकं आणि हिरेन हत्या प्रकरणांच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. आपणच या वस्तू नदीत फेकल्याची कबुली वाझेंनी एनआयएला दिली आहे.

मिठी नदीतून बाहेर काढण्यात आलेल्या डीव्हीआरमध्ये वाझेंच्या इमारतीमधील सीसीटीव्हीचं १७ ते २४ फेब्रुवारी दरम्यानचं फुटेज आहे. वाझेंनी काही दुकानांमधून बोगस नंबर प्लेट तयार करून घेतल्या. त्या दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्हींचा डीव्हीआरदेखील वाझेंनी मिठी नदीत फेकला होता.

मिठी नदीत सापडलेल्या सर्व वस्तू मनसुख हिरेन यांची हत्या होईपर्यंत वाझेंच्या ताब्यात होत्या. वाझेंची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी त्या मिठी नदीत फेकल्या. आता त्या वस्तू एनआयएनं मिठी नदीतून काढल्या आहेत. त्यामुळे वाझेंभोवतीची मगरमिठी आणखी घट्ट झाली आहे.