Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

By सायली शिर्के | Published: September 23, 2020 01:43 PM2020-09-23T13:43:11+5:302020-09-23T14:05:57+5:30

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे. (सर्व फोटो: सुशील कदम)

सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसला आहे.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. दादर, वरळी, सायन, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सायन ते कुर्ला, चुनाभट्टी ते कुर्ला या स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची अत्यावश्यक सेवेतील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.

रस्ते जलमय झाले आहेत. मालाड, अंधेरी, खार या भागांतही पाणी साचले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. याबाबत मुंबई पालिकेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्या पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई शहरात ७३.५२, पूर्व उपनगरात २७.८७ आणि पश्चिम उपनगरात ७८.६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दादर, धारावी, वडाळा, महालक्ष्मी, कुलाबा, चेंबूर, कुर्ला, मालाड, मालवणी, कांदिवली, अंधेरी, वांद्रे, वर्सोवा, पार्ले येथे मुसळधार पावसाची नोंद झाली.

Read in English