मध्य रेल्वेची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! १० महिन्यांत १३७ कोटी प्रवासी; रोज किती जण करतात प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:45 IST2026-02-19T19:26:51+5:302026-02-19T19:45:04+5:30

Central Railway Train Passengers Reach to 137 Crore: दररोज मध्य रेल्वे मेन लाइन आणि हार्बर लाइनवरून किती लोकल सेवा चालवते? मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये किती वाढ झाली? जाणून घ्या...

Central Railway Train Passengers Reach to 137 Crore: मुंबई लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. मुंबईत पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर कोट्यवधी प्रवास करत असतात. देशातील मोठ्या नेटवर्कपैकी एक मानल्या गेलेल्या मध्य रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून दाखवली आहे. मध्य रेल्वेची प्रवासी संख्या १३७ कोटींवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेतून दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करतात. जानेवारी २०२६ मध्ये १२.७ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर, मध्य रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेतून एप्रिल ते जानेवारीदरम्यान सुमारे १३७ कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात (जानेवारी २०२६ पर्यंत) प्रवासी वाहतुकीत उल्लेखनीय वाढ झाल्याची नोंद झाली आहे. लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा या दोन्ही विभागांमध्ये स्थिर वाढ नोंदवली आहे.

मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण १३७ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षी याच कालावधीत १३४ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा सुमारे १.८६ टक्के अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये लोकलमधून १२० कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर, गेल्यावर्षी ११८ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मेल / एक्सप्रेस / पॅसेंजर आणि इतर उपनगरीय ट्रेनमधून १७ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर, गेल्यावर्षी १६ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

जानेवारी २०२६ मध्ये मध्य रेल्वेतून १४ कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्यापैकी १२ कोटीहून अधिक प्रवाशांनी लोकल आणि १.७ कोटी प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून प्रवाशांनी प्रवास केला.

नेरुळ / बेलापूर – उरण विभागात अतिरिक्त सेवा सुरू केल्यानंतर आणि या मार्गावर तारघर आणि गव्हाण स्थानकांचे लोकार्पण केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत काहीशी वाढ झाली.

हार्बर मार्गावर वातानुकूलित सेवा सुरू केल्याने १६ दिवसांच्या अल्पावधीत ६ लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला. यामधून आरामदायी आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेतील वाढीला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

सध्या, मध्य रेल्वेद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील वाढती मागणी लक्षात घेऊन ९४ वातानुकूलित लोकल सेवांसह १,८२० लोकल सेवा चालविण्यात येत आहेत.

हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी – पनवेलदरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या २६ जानेवारीपासून सुरू झाल्या. हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या १४ फेऱ्या रद्द करून त्या वेळेत १४ वातानुकूलित लोकल चालवण्यात सुरूवात झाली.

तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या ८० वातानुकूलित लोकल धावत आहेत. हार्बर मार्गावर १४ वातानुकूलित लोकल फेऱ्यांची वाढ झाली असून मध्य रेल्वेवर एकूण ९४ वातानुकूलित लोकल धावत आहेत.

मध्य रेल्वे आपल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि वाढत्या प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या सेवा मजबूत करत आहे.