Join us  

मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 11:38 AM

1 / 10
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील ६ मतदारसंघात मतदान पार पडेल. मतदानाला काहीच दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील राजकीय प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना समोरासमोर आहे.
2 / 10
तर मुंबईतील उर्वरित ३ जागांपैकी २ जागांवर भाजपा आणि काँग्रेस तर एका जागेवर उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमनेसामने आहे. मुंबईत ६ जागा आहेत, ज्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागा आहेत.
3 / 10
येत्या २० मे रोजी या जागांवर मतदान होणार आहे. त्यातील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात शिंदे-ठाकरेंमध्ये सामना आहे. तर ईशान्य मुंबईत भाजपाविरुद्ध उद्धव ठाकरे अशी ही लढत होणार आहे.
4 / 10
दक्षिण मुंबई- ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंकडून यामिनी जाधव, जाधव या भायखळा विधानसभेतून आमदार आहेत. दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंचे राहुल शेवाळे असा सामना आहे. देसाई हे राज्यसभेचे तर राहुल शेवाळे विद्यमान लोकसभेचे खासदार आहेत.
5 / 10
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांचा सामना शिंदेचे रवींद्र वायकर यांच्यासोबत होणार आहे. वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे आमदार आहेत. शिवसेना फुटीनंतरही वायकर ठाकरेंसोबत होते. परंतु काही महिन्यांपूर्वीच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले.
6 / 10
२०१९ पर्यंत मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस परंपरागत विरोधक होते. मात्र दोन्ही पक्षांनी सत्तेसाठी अनेकदा राजकीय रणनीती आखली. मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसं सख्य असल्याचं चित्र नव्हते.
7 / 10
उद्धव ठाकरे राहत असलेला परिसर हा उत्तर मध्य मुंबईत येतो, इथं काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना संधी दिली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि कुटुंब काँग्रेसच्या पंचावर मतदान करणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसनं मुंबईतील एकही जागा जिंकली नाही.
8 / 10
२०२२ मध्ये शिवसेना फुटीनंतर मुंबईत अंधेरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पोटनिवडणूक झाली. त्यात ठाकरे गटाने विजय मिळवला होता. या निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपानेही कुठलाही उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता.
9 / 10
भाजपाने २०२४ च्या निवडणुकीत मुंबईतील तिन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली. तर शिंदेंच्या शिवसेनेने राहुल शेवाळे यांना पुन्हा रिंगणात उतरवले. तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन किर्तीकरांऐवजी वायकर यांना उभे केले.
10 / 10
ईशान्य मुंबईत भाजपाने मिहिर कोटेचा यांना तर मविआकडून ठाकरेंचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होतेय. कोटेचा हे मुलुंड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तर संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत ज्यांनी ३ वर्षापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४