सर्वात श्रीमंत तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टमध्ये मिलिंद नार्वेकर; कसा चालतो कारभार? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:10 PM2021-09-16T14:10:12+5:302021-09-16T14:16:40+5:30

TTDT: तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत ट्रस्ट असून, येथे तब्बल १६ हजार कर्मचारी काम करतात.

देशात अनेकविध मंदिरे अशी आहेत, जी प्रचंड श्रीमंत देवस्थाने म्हणून ओळखली जातात. हजारो लाखो भाविक दररोज या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असतात. यातील एक सर्वांत श्रीमंत देवस्थान म्हणजे तिरुमला तिरुपती.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या नियुक्तीसाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शिफारस केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. (tirumala tirupati devasthanam trust)

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे. तिरुपती व्यंकेटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याचे काम या ट्रस्टकडे आहे. तिरुपतीमध्येच टीटीडी म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यालय आहे. जिथे तब्बल १६ हजार कर्मचारी काम करतात.

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टची स्थापना १९३२ मध्ये झाली. यासाठी टीटीडी अधिनियम बनवण्यात आला. मंदिराच्या संचालनासाठी ७ सदस्यांची एका कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मद्रास सरकारद्वारे आयएएस दर्जाच्या एका आयुक्ताची नेमणूक करण्यात आली. समितीला सल्ला देण्यासाठी २ सल्लागारांची नियुक्ती झाली. याशिवाय पुजाऱ्यांचीही नियुक्ती यामध्ये करण्यात आली.

यानंतर ट्रस्टमधील सदस्यांची संख्या ५ वरुन ११ करण्यात आली. तर सन १९७९ मध्ये ही सदस्य संख्या १५ करण्यात आली. वंशावळीनुसार पुजारी बनण्याची पद्धत संपवण्यात आली. गैरहिंदूंना तिरुपतीला भेट द्यायची असल्यास, त्यांना व्यंकटेश्वरावर विश्वास आहे, असे लिहलेल्या फॉर्मवर सही करण्याचा कायदा आला.

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट अंतर्गत अनेकविध विभाग काम करतात. यामध्ये लाडू बनवण्याचा विभाग, रस्ते आणि पूल बनवण्यासाठी इंजिनिअरिंग विभाग, पाण्याच्या नियोजनासाठी जलसंपदा विभाग, भक्तांना मंदिरापर्यंत आणणे आणि पुन्हा तिरुपतीत सोडण्यासाठी बसेसची गरज लागते.

तिरुपती ट्रस्ट या बस मोफत पुरवते, यासाठीचा पहिवहन विभाग, अर्थ आणि लेखापाल विभाग, जनसंपर्क विभाग, वन आणि उद्यान विभाग, मंदिर अनेक शाळा महाविद्यालये चालवते, रुग्णालयाची सेवा देते, यासाठीचा शिक्षण आणि आरोग्य विभाग.

या संस्थानाचा पसारा एवढा मोठा आहे की, त्याचा गाडा यशस्वीपणे हाकण्यासाठी अवघ्या काही लोकांचे काम नाही. म्हणून देशभरातून या संस्थानावर सदस्य भरले जातात. या देवस्थानच्या ट्रस्ट सदस्यपदासाठी देशभरातून २४ सदस्यांची निवड केली असून, यामध्ये मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचे काम पाहायचे. एका सामान्य कुटुंबात जन्माला जन्मलेले मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होण्यासाठी धडपडत होते. मुलाखत देण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पहिल्याच भेटीत वाकचातुर्य पाहून उद्धव ठाकरेही प्रभावित झाले.

नार्वेकरांचा एकंदरीत अनुभव आणि कौशल्य पाहता उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी सोपवायची याबाबत त्यांना विचारणा केली. मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या उत्तरानं उद्धव ठाकरेही खूश झाले, तेव्हापासूनच ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. साधारण १९९४ साली मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले.

यानंतर आजतागायत उद्धव ठाकरे यांची सावली बनून मिलिंद नार्वेकर त्यांच्यासोबत कायम असतात. मिलिंद नार्वेकर सध्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग गर्व्हिनिंग कौन्सिलचे अध्यक्षही आहेत. मात्र आता मिलिंद नार्वेकरांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नेमणूक करुन देशपातळीवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.