शिंदे गटाचं जबरदस्त प्लानिंग! मेळाव्यात 'बाहुबली' तलवारीचं शस्त्रपूजन, ठाकरे कुटुंबातील सदस्यही येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:02 PM2022-10-04T18:02:44+5:302022-10-04T18:10:16+5:30

दसरा मेळाव्यावरुन शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला असताना आता दोन्ही गटाकडून मेळाव्यसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. यात शिंदे गटाकडून बीकेसीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यात यावेळी ऐतिहासिक तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटानं तंत्रज्ञानाचा वापर करुन मेळावा जास्तीत जास्त भव्य दिव्य करण्यावर भर दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात तब्बल ५१ फूट लांबीची तलवार तयार करण्यात आली आहे. शिंदे यांच्या हस्ते या तलवारीचं दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. बीकेसीतील एमएमआरडी मैदानात मुख्य मंचासमोरच ही तलवार साकारण्यात आली आहे. तलवारीच्या शस्त्रपूजनानं मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

ठाकरे गटापेक्षा दहा पट जास्त लोक एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला उपस्थित असतील असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून केला जात आहे. त्यासाठी तशी तयारी देखील करण्यात आलेली दिसून येत आहे. मैदानात सध्या कार्यकर्त्यांसाठी सव्वा लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची आणि नाश्त्याचीही व्यवस्था पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून बीकेसीतील सभा मंडपासूनच बाजूला एक सेपरेट किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. यात उद्या सकाळपासूनच ५ लाख वडापाव बनवण्याची तयारी केली जाणार आहे. तसंच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

बीकेसीत फिरत्या शौचालयांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या स्वच्छता व्यवस्थेचीही काळजी घेण्यात आली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी उपस्थिती लावणाऱ्यांच्या जेवणाची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आली आहे. सरनाईक यांच्याकडून दोन लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या स्विट्सच्या दुकानदाराला देण्यात आली आहे.

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे हे हायड्रोलिक सिस्टमनं स्टेजवर अवतरणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यासाठीची तयारी सध्या सभास्थळी केली जात आहे. त्यामुळे शिंदे यांची सभा तंत्रज्ञानानं सज्ज अशी असणार आहे.

तसंच स्टेजच्या मागच्या बाजूला दोन भव्य क्रेन उभारण्यात आल्या असून त्यातून होलोग्राम टेक्नोलॉजिचा वापर करुन दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होलोग्राम तयार करण्यात येणार आहे. खुद्द बाळासाहेब ठाकरे मंचावर अवतरत आहेत असं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमधून एकूण ४० व्हिडिओ तयार ठेवण्यात आले आहेत. हे व्हिडिओ मेळाव्यात भल्या मोठ्या एलईडी स्क्रिनवर लावण्यात येणार आहेत. एकूण १५ हजार स्वेअर फुटांची भव्य एलईडी स्क्रिन तयार करण्यात आली आहे. या व्हिडिओंच्या माध्यमातून बाळासाहेबांची काही महत्वाची विधानं दाखवली जाणार आहे. यातून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असणार आहे.

शिंदेंच्या मेळाव्यात ५१ फुटी तलवारीचं शस्त्रपूजन झाल्यानंतर आमदार उदय सामंत यांच्याकडून १२ किलो चांदीची तलवार मुख्यमंत्री शिंदे यांना भेट म्हणून दिली जाणार आहे. आजवर ११ फुटी चांदीच्या तलावारीचा वर्ल्डरेकॉर्ड आहे. आता उद्या १२ फुटी चांदीची तलवार देऊन नवा विक्रम रचण्याची तयारी शिंदे गटानं केली आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फुटी मंच तयार करण्यात आला आहे. या मंचावर उद्या ठाकरे गटातील व्यक्ती दिसू शकेल. फक्त शिवसैनिक किंवा कार्यकर्तेच नव्हे तर ठाकरे परिवारातील कुटुंब शिंदे गटासोबत असल्याचं यातून संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी आठ वक्त्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तसंच उद्या शिंदेंच्या उपस्थितीत काही प्रवेश होणार असून यातून ठाकरेंना धक्का देण्याचा शिंदे गटाचा मानस असल्याचंही बोललं जात आहे.