Ganeshotsav 2022: वांद्रे येथे ५२ फुटी पशुपतिनाथ मंदिर उभारलं; बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:16 PM2022-08-29T15:16:29+5:302022-08-29T15:19:55+5:30

कोविडच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक मंडळाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे गणेश मंडळाच्या देखावे आणि मंडपाची जय्यत तयारी पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणा-या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिध्द पशुपतिनाथ मंदिराची ५२ फुट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे २७ वे वर्ष आहे.

प्रत्येक वर्षी या मंडळाकडून एका प्रसिध्द मंदिराची प्रतिकृती साकारली जाते. गतवर्षी केदारनाथ मंदिर साकारण्यात आले होते तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळा गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

यापूर्वी शिर्डीचे साई मंदिर, पंढपरपूचे विठ्ठलमंदिर यासह महाराष्ट्र्र, गुजरात, गोव्यातील प्रसिध्द मंदिराची आरास करण्यात आली होती. विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होतात आणि मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट.

या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चित्रपट, क्रिडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे. तसेच कोरोना काळातही उत्सवाची परंपरा खंडित केली नाही. सातत्याने २७ वर्षे गणपती सोबतच एका प्रसिध्द देवस्थानाचे दर्शन या मंडळातर्फे भाविकांना घडविण्यात येत आहे.

यावर्षी पशुपतिनाथांचे मंदिर साकारण्यात आले असून हिमालयाच्या कुशीत नेपाळ येथे असणारे भगवान शिवाचे हे प्राचिन मंदिन असून मंदिराची वास्तुरचना पॅगोडा पध्दतीची आहे. हे मंदिर जागतिक वारसा लाभलेल्या वास्तुपैकी एक आहे. मुळ मंदिराची जशीच्यातशी वास्तुरचना तर करण्यात आली आहेच शिवाय मंदिरात असणारे वैशिष्टपूर्ण शिवलिंग व मंदिराचा गाभाराही हुबेहुब साकारण्यात आला आहे.

ही सकंल्पा ज्यांची आहे असे मंडळाचे प्रमुख सल्लागार आमदार ॲड आशिष शेलार यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असं आवाहन केले आहे. धार्मिकेतेसोबत अनेक वैद्यकीय व सामाजिक, सांस्कृतीक उपक्रमही राबविण्यात येत असून आरोग्याबाबत आवश्यकते नियम मंडळातर्फे आम्ही पाळणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.