नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:27 IST2025-07-17T17:20:33+5:302025-07-17T17:27:31+5:30

Borivali Sanjay Gandhi National Park Mumbai Van Rani Mini Toy Train Comeback Update: बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील मुंबईची नवीन ‘वनराणी’ नेमकी कशी असेल? मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कधीपासून सेवा सुरू होईल? सविस्तर जाणून घ्या...

Sanjay Gandhi National Park Mumbai Van Rani Mini Toy Train Comeback Update: मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क मुंबईकरांचे खास आवडते ठिकाण. हजारो मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी दररोज नॅशनल पार्कसाठी जात असतात. परंतु, पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून येत असतात. पावसाळ्यात तर नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारणे ही मोठी पर्वणीच असते.

Borivali National Park Mini Toy Train Updates: मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहानमोठ्या सर्वांना सर्वांना मोहित करणारी ‘वनराणी‘ ही टॉय ट्रेन काही वर्षांपूर्वी कार्यान्वित होती. परंतु, २०२१ मध्ये ती बंद झाली होती. परंतु, आता हीच मुंबईची आवडती वनराणी म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॉय ट्रेन प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे.

जुन्या स्वरुपाची कात टाकून ही वनराणी नव्या रंगात, नव्या ढंगात प्रवासी, पर्यटकांना नॅशनल पार्कची सफर घडवण्यासाठी सज्ज होत आहे. व्हिस्टाडोमच्या प्रकारात या वनराणीचे डबे असणार आहेत. या नव्या टॉय ट्रेनची रंगसंगती आकर्षक करण्यात आली असून, व्हिस्टाडोममुळे जंगल सफारीचा आनंद लुटता येऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्या सर्वांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ ही मिनी टॉय ट्रेन ऑगस्टमध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात मिनी टॉय ट्रेन बंद पडली होती.

ही टॉय ट्रेन ऑगस्ट महिन्यात पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे. उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ पर्यटकांचे आकर्षण होती.

मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’मधून उद्यानाची सफर करण्याची मजा लुटत होते. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली, अनेक रस्ते उखडले गेले.

वनराणीच्या २.३ किमी लांबीच्या वळणदार मार्गावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही प्रचंड नुकसान झाले होते. वनराणीची धाव तेव्हापासून बंद झाली. वनराणी नव्याने सुरू करण्यासाठी २.३ किमीचा रेल्वे मार्ग पूर्णत: नव्याने बांधावा लागला.

गेल्या वर्षी वनराणीचे काम सुरू झाले होते. तब्बल पाच वर्षांनी ऑगस्ट २०२५ पर्यंत वनराणी पुन्हा नव्याने पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पूर्वी डिझेलवर चालणारी गाडी आता विजेवर धावणार आहे. त्यात चार डबे असतील.

मार्गावरील स्थानकांचे, तसेच कृत्रिम बोगद्याचेही नूतणीकरण करण्यात आले आहे. तसेच रुळही नवीन बसविण्यात आले आहेत. चाचणी फेऱ्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच नियमित सेवा सुरू होणार असून पर्यटक आणि विशेषतः लहान मुलांना मुंबईच्या हरित परिसरात फेरफटका मारण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

नवीन व्हिस्टाडोम ‘वन राणी’ ही बॅटरीवर चालणारी आहे व चार डबे आहेत. या डब्यांवर SGNP मधील प्राणी आणि निसर्गचित्रे रंगवलेली आहेत. पारदर्शक छत व मोठ्या काचांच्या खिडक्यांमुळे संपूर्ण परिसराचा विहंगम अनुभव घेता येईल. या डब्यांची आसनरचना मेट्रोसारखी असून प्रवास अधिक आरामदायक ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय उद्यानात १९७४ मध्ये वनराणी सुरू झाली. वनराणीच्या माध्यमातून उद्यानास दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये महसूल मिळत होता. आकर्षक, छोटेखानी इंजिन आणि त्यात जोडलेले चार खुले डबे अशी रचना असलेली वनराणी उद्यानाच्या झाडीतून धावताना जंगलाचे सौंदर्य न्याहाळता येत होते.

एका वेळी गाडीच्या प्रत्येक डब्यात १६ प्रमाणे ६४ प्रवाशांना सैर करता येत होती. ही फेरी साधारण ३० मिनिटांची होती. आता नव्याने वि‍जेवर धावणारी वनराणी सज्ज होत आहे.