"तुमच्या प्रवचनाला गर्दी प्रेमामुळे नाही, तर..."; राज ठाकरेंची मोहन भागवत यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:41 IST2026-02-10T10:39:35+5:302026-02-10T10:41:05+5:30
मुंबईत ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक आंदोलनांना 'आजार' संबोधले.

"तुमच्या प्रवचनाला गर्दी प्रेमामुळे नाही, तर..."; राज ठाकरेंची मोहन भागवत यांच्यावर टीका
मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरु सेंटर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक आंदोलनांना 'आजार' संबोधले. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या विधानावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ठाकरे यांनी भागवत यांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, संघाच्या राजकीय हस्तक्षेपावरही सडकून टीका केली आहे.
अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार?; संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष
"लोकांची उपस्थिती मोदींच्या भीतीपोटी"
राज ठाकरे यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच टोले लगावले आहेत. 'मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला जी मान्यवरांची गर्दी झाली होती, ती त्यांच्या प्रेमापोटी नव्हती तर "नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे" होती, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. "रटाळ प्रवचनांना लोक का येतील?" असंही ठाकरे म्हणाले.
भाषिक अस्मिता 'आजार' नाही, तो 'उद्रेक'
मोहन भागवतांनी भाषिक आग्रहाचा उल्लेख 'आजार' असा केल्यावर राज ठाकरेंनी त्यांना इतिहासाची आणि वर्तमानाची आठवण करून दिली. देशव्यापी अस्मिता- कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, पश्चिम बंगाल आणि अगदी गुजरातमध्येही हीच भावना आहे.
परप्रांतीयांचा हस्तक्षेप
जेव्हा बाहेरून येणाऱ्या झुंडी स्थानिक संस्कृती आणि भाषेचा अपमान करतात, तेव्हा होणारा तो उद्रेक असतो, आजार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
गुजरातचा दाखला दिला दाखला
"गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना पळवून लावले, तेव्हा तिथे समरसतेचे धडे का दिले नाहीत?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
राज ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अप्रत्यक्ष राजकीय भूमिकेवरही निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी भय्याजी जोशींनी मुंबईच्या भाषेवरून केलेले विधान आणि आता भागवतांचे विधान हे भाजपला राजकीय फायदा पोहोचवण्यासाठीच असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. "स्वतःला अराजकीय म्हणवता तर या भानगडीत पडता कशाला?" असा सवाल ठाकरे यांनी केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घरचा आहेर
संघाच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, "हिंदुत्वाच्या नावाखाली जो धिंगाणा सुरू आहे, कावड यात्रेतील बीभत्स प्रकार आणि २०१४ नंतर बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागला, यावर सरसंघचालक कधी बोलणार?, असा सवालही ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, हिंदूंवर संकट आल्यास मनसे धावून जाईलच जसे रझा अकादमी दंगल किंवा भोंग्यांच्या विरोधात गेले, पण गोहत्येच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणावर संघाने सरकारचे कान टोचले पाहिजेत, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
"त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
— Raj Thackeray (@RajThackeray) February 10, 2026
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु…