आपले नाव कुठल्या प्रभागाच्या मतदार यादीत ते आज कळणार; महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी होणार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:59 IST2025-12-15T12:59:01+5:302025-12-15T12:59:39+5:30
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

आपले नाव कुठल्या प्रभागाच्या मतदार यादीत ते आज कळणार; महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी होणार जाहीर
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आपले नाव कुठल्या प्रभागात आहे ते कळेल. २० नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय ४ लाखांहून अधिक नावे ही दुबार, तिबार असल्याचेही प्रकार समोर आले आहेत.
या तक्रारी दूर करत आज पालिकेकडून मतदारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, दुबार मतदारांच्या फेरपडताळणीचे काम सुरू राहणार असून आतापर्यंत जवळपास १ लाखांहून अधिक दुबार मतदारांची फेरपडताळणी पार पडली आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवरील १० हजारांहून अधिक हरकतींवर पालिकेकडून निर्णय देण्यात आला.
मतदारांची स्थलांतरित संख्या १०० हून अधिक
अंतिम मतदार यादीसाठी पालिकेकडून 'कंट्रोल चार्ट' तयार करण्यात आला असून हरकतींबाबतच्या कंट्रोल चार्टमध्ये स्थलांतरित मतदारांची संख्या १०० हून अधिक असल्याचे उघड झाले आहे.
मतदार याद्यांची फेर पडताळणी सुरू राहणार
राज्य निवडणूक आयोगाने मुंबईत ११ लाख १ हजार दुबार मतदार असल्याचे दर्शविले होते. बीएलओ व पालिका कर्मचारी घरी जाऊन दुबार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करत आहेत.
शुक्रवारपर्यंत ११.११ लाख दुबार नावांपैकी अजून ८.७५ लाख नावे तपासायची बाकी असून प्रत्यक्ष दुबार नावे फक्त १५ ते २० टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर होण्याआधी येत्या २ ते ३ दिवसांत ही फेरपडताळणी पूर्ण केली जाईल असे अधिकारी म्हणाले.
मतदारांची नावे इतरत्र गेल्याने उमेदवारांना फटका
१. प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या.
२. याचा फटका फक्त मतदानाच्या टक्क्यांवर होणार नसून उमेदवारांच्या निकालावरही होण्याची शक्यता आहे.
३. माजी नगरसेवक आणि स्थानिक रहिवाशांकडून याबाबत प्रचंड रोष आहे. त्यामुळे मूळ मतदारांचा आपल्या प्रभागात समावेश करावा, अशी मागणी आहे.
किती मतदारांना दिलासा... अंतिम यादीनंतरच कळणार
अशा सर्व प्रकरणांत गुगल मॅपमध्ये दर्शविण्यात आलेल्या प्रभागनिहाय सीमांनुसार घर, इमारत, चाळ- वसाहत यांची पडताळणी करून याबाबत प्रमाणपत्र व छायाचित्र सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या अंतिम यादीनंतरच किती मतदारांना दिलासा मिळणार हे यादी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.