होय, 'त्या' ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो; फडणवीस-राज भेटीवर अजितदादा बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:49 IST2020-01-08T21:49:18+5:302020-01-08T21:49:46+5:30
भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत होणाऱ्या २३ जानेवारीच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

होय, 'त्या' ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो; फडणवीस-राज भेटीवर अजितदादा बोलले
मुंबई - राज्यातील बदलत्या समीकरणानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, मित्रपक्ष शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर एकट्या पडलेल्या भाजपानेमनसेशी जवळीक साधण्यात सुरुवात केली आहे. याच दरम्यान राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात दिड तास गुप्त बैठक झाली. या भेटीवर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ज्या ठिकाणी भेट झाली होती. त्याच ठिकाणी मीही राज ठाकरेंना भेटलो होतो. पण त्या दोघांच्या भेटीत काय झालं याची माहिती माझ्याकडे नाही.
भाजपा-मनसे भविष्यात एकत्र येऊ शकतात अशा विविध चर्चांना उधाण आलं असून राजकारणात काहीही घडू शकतं असा दावा दोन्ही पक्षाचे नेते करत आहेत. अजित पवार यांनीही महाविकास आघाडीत काही शक्य होणार नाही असं सांगत एका रात्रीत भाजपाशी घरोबा करत उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतलं होतं. अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने शिवसेना-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.
मात्र अजित पवारांचे बंड शमवण्यात शरद पवारांना यश आलं. त्यानंतर अजित पवारांनी ८० तासानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अल्पकालावधीतील भाजपा सरकार कोसळलं. मात्र असं असलं तरी भाजपा नेत्यांकडून अद्यापही सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु असल्याचं राजकीय गोटात बोललं जात आहे. राज ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक साधली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत काही अपवाद वगळता राज यांच्या मनसेने स्वबळावर निवडणूक लढवली होती. याचवेळी राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात दादरमध्ये बैठक झाल्याची बातमी होती.
भाजपा-मनसे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मुंबईत होणाऱ्या २३ जानेवारीच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं गरजेचे आहे. मराठी कार्डाचा वापर करुन अपेक्षित यश निकालात मिळत नसल्याने राज ठाकरे सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने जातील असं सांगण्यात येत आहे. मनसेच्या धोरणांमध्ये तसेच झेंड्यामध्ये बदल करण्यात येईल असं सांगितले जात आहे. मात्र मनसे-भाजपा संभाव्य युतीवर महाविकास आघाडीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.