मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:48 IST2025-12-19T09:48:06+5:302025-12-19T09:48:47+5:30
आज राखी जाधव यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी शरद पवारांची भेट घेतील आणि महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करतील.

मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
मुंबई - महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीतील जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्यात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्रित येत निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यात आता मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती करावी असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. याबाबत आज शरद पवारांसोबत बैठकीत चर्चा होणार आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आज मुंबईतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्षा राखी जाधव मांडणार आहेत. २ दिवसांपूर्वी मुंबईतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात ठाकरे बंधू यांच्यासोबत युती करावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होते. त्यानंतर आज शरद पवारांसोबत पदाधिकारी बैठक होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे यापेक्षा वाढीव जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत अशी भूमिका राखी जाधव यांची आहे.
जवळपास २२ जागा मुंबईत लढायला मिळायला हव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची आहे. आज राखी जाधव यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी शरद पवारांची भेट घेतील. रविवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या बैठकीचं निमंत्रण घटकपक्षांना देणार आहे. त्या बैठकीपूर्वी पक्षातंर्गत आजची बैठक होत आहे. त्यात किती जागा लढवायच्या यावर चर्चा होणार आहे.
काँग्रेसचा स्वबळाचा नारा
दरम्यान, मुंबई महापालिकेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मात्र त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीसाठी इच्छुक आहेत मात्र काँग्रेसला मनसेसोबत युती करायची नाही. मनसे आणि आमची भूमिका वेगळी आहे. आम्ही मारहाणीचं समर्थन करत नाही असा पवित्रा घेत काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ठाकरे बंधू युतीच्या बैठका सुरू झाल्या. जागावाटपावर चर्चा होत आहेत. आता राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार की काँग्रेससोबत आघाडी करणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल.