शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:19 IST2025-12-24T10:18:50+5:302025-12-24T10:19:44+5:30
मुंबईत ठाकरे बंधू यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते.

शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
मुंबई - राज्याच्या राजकारणात कलाटणी देणारा ऐतिहासिक क्षण आज ठाकरे बंधू यांच्या युतीच्या घोषणेमुळे येणार आहे. मुंबईसह विविध महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मागील कित्येक दिवसांपासून ठाकरे बंधू यांच्यातील जवळीक अनेकांना दिसून आली. त्यातून आज या दोन्ही नेत्यांचे पक्ष राजकीयदृष्ट्या एकत्र येणार आहे. त्यामुळे या उद्धवसेना-मनसे युतीच्या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू यांच्या युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार की नाही असा प्रश्न कायम आहे.
मुंबईत ठाकरे बंधू यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर काही नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले. यंदाच्या महापालिका निवडणुकीत शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा कल ठाकरे बंधू यांच्या युतीसोबत जाण्याचा होता. याबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत बैठकाही झाल्या. मात्र त्यानंतर मंगळवारी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार की ठाकरेंसोबत जाणार हा संभ्रम निर्माण झाला आहे.
याबाबत उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, मंगळवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अध्यक्षा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक झाली. काही प्रस्ताव त्यांच्याकडून आले आहेत. त्यावर चर्चाही झाली आहे. विक्रोळी, चारकोप, दिंडोशी यासारख्या भागातील जागांची त्यांची मागणी आहे. मात्र त्याठिकाणी आधीपासून स्थानिक नेतृत्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे. ते काँग्रेससोबत बोलत असतील तर अयोग्य वाटत नाही. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असं प्रत्येक पक्षाला वाटते. त्यामुळे जर त्यांना त्याठिकाणी न्याय मिळत असेल असं वाटतंय तर त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही लोक सोयीनुसार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतात. आज आम्ही जाणार त्यामुळे काहीजण काल जाऊन आले. महायुतीत काही आलबेल नाही. मित्रपक्षातील उमेदवार फोडण्याचं काम भाजपा आणि शिंदेसेना करत आहेत. त्यामुळे महायुतीत काय सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं सांगत सचिन अहिर यांनी महायुतीवर निशाणा साधला.