नव्या भूमिकेने राज ठाकरेंना मिळणार का मतदार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 02:08 AM2019-04-25T02:08:54+5:302019-04-25T07:12:28+5:30

मोदीविरोधी राजकारणाचे इंगित; असलेल्यांना काम, नव्यांना निमंत्रण

Will Raj Thackeray get a new role? | नव्या भूमिकेने राज ठाकरेंना मिळणार का मतदार?

नव्या भूमिकेने राज ठाकरेंना मिळणार का मतदार?

Next

मुंबई : ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधत भाजपला मतदान करू नका, असा संदेश राज देत आहेत. त्यांच्या सभांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर, मनसेचा मतदार पंजाचे बटण दाबेलच कसा, असा सवाल शिवसेना-भाजपकडून होत आहे.

प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी प्रचारसभा आणि त्याच्या तयारीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पक्षाची सैल झालेली वीण घट्ट करता येते का? दुरावलेला मतदार जवळ करता येतो का? नवा मतदार जोडता येईल का? याची चाचपणी मनसेकडून सुरू आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू करण्यापूर्वी मनसे नेत्यांनी विभागवार बैठका घेतल्या. यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासोबतच पुढील वाटचालीची पायाभरणीही झाली.



२००७ साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेच्या मैदानात उतरलेल्या मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २०१२ साली तब्बल २७ नगरसेवकांसह मनसेने सत्ताधारी शिवसेना-भाजपला चांगलेच जेरीस आणले होते. त्यानंतर मात्र मनसेच्या राजकारणाचे इंजिन रुळावरून घसरले. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचा गाडा पुन्हा एकदा सात नगरसेवकांवर जाऊन थांबला. शिवाय, संघटनात्मक उलथापालथ होत राहिली आणि गटनेत्यासह सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत डेरेदाखल झाले.

नव्या मुद्द्यांची वानवा, उचललेले मुद्दे तडीस नेण्यास कमी पडलेले नेतृत्व आणि पक्षाला कार्यक्रम देण्यात आलेले अपयश यामुळे संघटन म्हणून मनसे कमकुवत होत गेली. मोदींच्या उदयानंतर राजकारणाचा सारीपाट बदलत गेला. एकेकाळी ज्या मोदींचे कोडकौतुक केले त्यांच्यावरच शरसंधान साधत नव्याने जनाधार शोधण्याची धडपड मनसेकडून सुरू आहे. राज यांचे वक्तृत्व आणि करिश्मा हीच मनसेची ताकद आहे. मोदीविरोधी राजकारणाने त्यालाच झळाळी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



मनसेला कुठे आहे स्थान?
२००९च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले होते. तर, तितकेच उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, २०१४ला एकही जागा राखता आली नाही. दुसºया क्रमांकावरील उमेदवारांची संख्याही तीनवर आली होती.
२०१४ नंतर थेट राज ठाकरेंवर लक्ष्य करीत अनेक दिग्गजांनी मनसे सोडली. जे राहिले तेही निष्क्रिय बनले. मोदीविरोधाच्या या नव्या डोसमुळे नेते, पदाधिकारी सक्रिय होतील, नवे जोडले जातील, असा दावा मनसेचे नेते करीत आहेत.

नवा पवित्रा, नवा मतदार!
लोकसभेनंतरची रणनीती गुलदस्त्यात आहे. आघाडीत इंजिनाला स्थान मिळेल का, याबाबत साशंकता आहे. भाजप, शिवसेना आणि मनसेची कुळी एकच असल्याने जसे वारे तसा मतदार फिरतो. नव्या भूमिकेमुळे भाजप आणि काँग्रेसला समान अंतरावर ठेवणारा नवा वर्ग मनसेशी जोडला जाईल, त्याचा फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात आगे.

Web Title: Will Raj Thackeray get a new role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.