नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर सरकारकडून प्रतिक्रिया का नाही, विनायक मेटेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:27 IST2021-06-14T21:26:36+5:302021-06-14T21:27:21+5:30
‘नक्षलवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल. नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव,’ असे मेटेंनी म्हटले आहे

नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर सरकारकडून प्रतिक्रिया का नाही, विनायक मेटेंचा सवाल
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राजकारण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. "मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा, आमच्यामध्ये सामील व्हा," असं आवाहनही नक्षलवाद्यांनी पत्रकाच्या माध्यमातून मराठा तरुणांना केलं आहे. त्यावरुन, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘नक्षलवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल. नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव,’ असे मेटेंनी म्हटले आहे. राज्य सरकारला यापूर्वीही अनेकवेळा आरक्षणप्रश्नी इशारा दिला आहे. आता ५ जुलैपर्यंत जर राज्य सरकारने आरक्षणासह इतर प्रश्न सोडवले नाहीत तर ७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा इशारा मेटेंनी दिला.
नक्षलवाद्यांचं मराठा तरुणांना आवाहन
"मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा," या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. "आमच्यामध्ये सामील व्हा," असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे.
नक्षलवाद्यांच्या पत्रकाला संभाजीराजेंच उत्तर
नक्षलवाद्यांच्या या पत्रानंतर आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे नक्षलवाद्यांनो या, आम्हीच तुमची वाट पाहत आहोत, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे फेसबुकद्वारे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. "नक्षलवाद्यांनो या, आम्हीच तुमची वाट पाहत आहोत, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.