‘शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का?’ भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:07 IST2026-02-16T15:05:49+5:302026-02-16T15:07:29+5:30
BJP Criticize Uddhav Thackeray: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे तीन दिवस उलटले तरी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी टीका भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे.

‘शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का?’ भाजपाचा सवाल
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे तीन दिवस उलटले तरी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार नाही, हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे गप्प आहेत का? छत्रपतींचा अवमान होत असताना उद्धव ठाकरे यांनी निषेध का केला नाही, असा सवाल भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी विचारला. उद्धव ठाकरेंमध्ये स्वाभिमान, थोडी जरी धमक शिल्लक असेल तर उद्धवसेनेने हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करावे, असे आव्हान बन यांनी दिले.
टिपू सुलतानवरून भाजपावर टीका करणा-या राऊतांना खडे बोल सुनावताना नवनाथ बन म्हणाले की, भाजपाचे धोरण स्पष्ट आहे. जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो, हिंदू मंदिरांची तोडफोड करतो, हिंदू आया बहिणींवर ज्याने बलात्कार केले, त्या टिपू सुलतानचे समर्थन भाजपा कधीच करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना मालवणीमध्ये पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न केला होता. त्याची आठवण करून देत बन म्हणाले की, त्यावेळी या विरोधात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजपा नेते मंगल प्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, अतुल भातखळकर, तेजिंदर तिवाना यांनी प्रखर विरोध केला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या पण त्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव देऊ दिल नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हीन काम केलं होतं, अशी टीका बन यांनी सोडले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना संजय राऊत त्याचा संबंध निवडणुकांशी जोडायचा घाणेरडा प्रयत्न करत आहेत, राजकारण करत आहेत. भाजपासाठी शिवरायांचा अपमान हा निवडणुकीचा विषय नाही, अस्मितेचा विषय आहे. निवडणूक पाहून आंदोलन करणे भाजपाच्या तत्वात बसत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवरायांचा सन्मान राखू, असेही म्हणाले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा कदापि सहन करणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ आहे, असा इशाराही नवनाथ बन यांनी दिला.