‘या’ मुलांच्या तोंडी घास का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:41 AM2019-06-23T07:41:36+5:302019-06-23T07:42:11+5:30

उशीर केलेल्या पावसाने या वर्षी होरपळलेल्या महाराष्ट्राच्या तहानेची पर्वा केली नाही आणि आता तो आला की, डोंगरदरीतल्या खेड्यापाड्यांत भुकेचे थैमान सुरू होईल.

Why do not these kids' grass? | ‘या’ मुलांच्या तोंडी घास का नाही?

‘या’ मुलांच्या तोंडी घास का नाही?

Next

- अपर्णा वेलणकर
मुंबई  - उशीर केलेल्या पावसाने या वर्षी होरपळलेल्या महाराष्ट्राच्या तहानेची पर्वा केली नाही आणि आता तो आला की, डोंगरदरीतल्या खेड्यापाड्यांत भुकेचे थैमान सुरू होईल. पावसाळ्यासोबत कुपोषणाच्या बातम्यांचे मोहोळ दरवर्षी बालमृत्यूंच्या दुर्दैवी आकडेवारीने भरलेले असते. या आकडेवारीला नवा आयाम देण्याच्या प्रयत्नात ‘लोकमत’ वृत्तसमूहाने पुढाकार घेतला असून, ‘पोषण परिक्रमा’ हे विशेष अभियान आजपासून सुरू होत आहे. युनिसेफ, हार्वर्ड टी. एच. चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ आणि देशभरातील पत्रकार-तरुण लोकप्रतिनिधींची संघटना असलेला ‘सिटिझन्स अलायन्स अगेन्स्ट मालन्यूट्रीशन’ हा कृतिगट यांच्यासह ‘लोकमत’ समूहाने या विशेष अभियानाची आखणी केली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे ते माता आणि बालकांच्या कुपोषणाचे. गडचिरोलीपासून सातपुड्यापर्यंत आणि मेळघाटापासून थेट ठाणे-पालघर-नाशिकजवळील आदिवासी पाड्यांपर्यंत गेली किमान तीन दशके वेढून असलेला कुपोषणाचा प्रश्न, हजारो कोटी खर्चूनही वाचवता न येणारे बालमृत्यू हा प्रागतिक महाराष्ट्राच्या प्रतिमेवरचा मोठा बट्टा! या किचकट प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी, जागतिक स्तरावर संशोधनात गुंतलेले अभ्यासक आणि नागरी समाज यांच्याबरोबरीने माध्यमे सकारात्मक जबाबदारी कशी पार पाडू शकतात; याचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. जागतिक ख्यातीप्राप्त हार्वर्ड विद्यापीठ आणि युनिसेफच्या तज्ज्ञांसोबत प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण संधी उपलब्ध करून दिलेले लोकमतचे एकूण 22 पत्रकार या उपक्रमात सहभागी झाले असून हा प्रशिक्षित गट एकूण तीन टप्प्यांत काम करील. त्यातील पहिला टप्पा हा पोषणासंबंधीची राज्यभरातील परिस्थिती व कुपोषणास कारणीभूत ठरणारे घटक शोधण्याचा असून पहिल्या टप्प्यातील परिक्रमा आजपासून रोज प्रसिद्ध होईल.
‘पोषण परिक्रमा’
1. ‘लोकमत’ समूहाच्या राज्यभरातील 22 पत्रकारांना ‘युनिसेफ’ व ‘हार्वर्ड टी. एच. चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ’च्या तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण
2. प्रशिक्षण वर्गानंतर पत्रकारांचे राज्यभर अभ्यास दौरे
3. अभ्यास दौऱ्यात हाती लागलेल्या वास्तवाची तज्ज्ञांसमोर मांडणी
4. कुपोषणाबाबतचे विद्यापीठीय संशोधन व वास्तवातील तिढ्यांची सांगड घालून संभाव्य उपाययोजनांकडे पोहोचण्याचा प्रयत्न
5. पुढच्या टप्प्यात लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणेला सहभागी करून घेण्याचे नियोजन

Web Title: Why do not these kids' grass?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.