राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:42 IST2025-04-06T09:41:54+5:302025-04-06T09:42:48+5:30
सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले.

राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनसेने बँकांच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर व्हावा, या मुद्द्यावर सुरू केलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतर आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत भेटल्यानंतर मागे घेतले.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील बँकांच्या व्यवहारात मराठीचा वापर होतो की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानुसार राज्यभरात कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला. त्यावेळी अनेक बँकेमध्ये गोंधळ
घातल्याच्या तसेच अमराठी अधिकाऱ्यांना दमदाटीच्या घटना समोर आल्या. बँक अधिकारी संघटनेने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. मराठीच्या वापराबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन सामंत यांनी दिले आहे. सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले.
अंमलबजावणीची अपेक्षा
आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची? अशी विचारणा करत राज ठाकरे यांनी सरकारकडून रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमाच्या अंमलबजावणीची अपेक्षा ठेवली आहे. परत कुठे नियम पाळला जात नसेल, मराठी माणसाला ला गृहीत धरले जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील, असा इशारा दिला.