अविश्वास ठराव असताना खुर्चीवर कशा? नियम सांगा…; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हेंवर आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:02 IST2025-03-07T09:01:39+5:302025-03-07T09:02:36+5:30
उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणण्याबाबतचे पत्र बुधवारी सभापती राम शिंदे यांच्याकडे दिले आहे.

अविश्वास ठराव असताना खुर्चीवर कशा? नियम सांगा…; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हेंवर आक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घटनापीठाच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर अविश्वास ठराव दाखल झाला असल्यास त्याला पदावर बसता येत नाही असा नियम असावा. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे त्या खुर्चीवर बसणे हे नैतिकतेला धरून आहे का? सभागृहाच्या सचिवालयाने यावर खुलासा करावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणण्याबाबतचे पत्र बुधवारी सभापती राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यानंतर गुरुवारी गोऱ्हे यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली होती.
सभापतींच्या गैरहजेरीत त्या सभापतींच्या खुर्चीत बसल्या. त्याला परब यांनी आक्षेप घेतला. सकाळी सभागृहात बसलात, त्यामुळे अविश्वास ठरावावर निर्णय होईपर्यंत आपण सभापतींच्या खुर्चीवर बसणार नाहीत असे वाटले, असे परब म्हणाले.
सभापती खुर्चीवर बसायला अडचण नाही - गोऱ्हे
अनिल परबांच्या आक्षेपाला उत्तर देताना गोऱ्हे यांनी गेल्या वेळीही माझ्यावर अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी असा ठराव दाखल झाला असला तरी ती व्यक्ती दैनंदिन कारभारात भाग घेऊ शकते असे गेल्यावेळी सांगितले होते. सभापती यांचे सभागृहात लक्ष आहे. तुमच्या आक्षेपाला समाधानकारक उत्तर दिले जाईल. माझ्यावरच मी बोलणे योग्य नाही. सभापतींच्या खुर्चीवर बसण्याला कोणतीही अडचण नाही, असे सांगितले.