Join us

महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री कोण? उद्धव, आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:50 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेने उद्या सत्तास्थापनेचा दावा सादर केला तर त्यांचे मुख्यमंत्री कोण असतील?

मुंबई : शिवसेनेने उद्या सत्तास्थापनेचा दावा सादर केला तर त्यांचे मुख्यमंत्री कोण असतील? स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे की ‘ठाणे’दार एकनाथ शिंदे या बाबतची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. मला एक ना एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवायचे आहे आणि तसा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला होता, असे उद्धव हे सातत्याने सांगत आले आहेत. आता शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची ‘हीच ती वेळ’ असे बोलले जात आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे कोणाला हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते. उद्धव जसे पक्षप्रमुख आहेत तसेच ते काय किंवा आदित्य काय हेदेखील पहिल्या प्रथम शिवसैनिकच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्यापैकी कोणतरी असावे अशी सामान्य शिवसैनिकांची भावना असल्याचे एका शिवसेना नेत्याने बोलून दाखविले. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रभावी नेते आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते सार्वजनिक उपक्रम मंत्री होते. निष्ठावंत शिवसैनिक ही त्यांची ओळख आहे.शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार आणि त्याला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असे होऊन सरकार स्थापन झाले तरी त्या सरकारच्या स्थैर्याबद्दल साशंकता असेल. ते सरकार कधीही कोसळू शकेल, त्यात विविध मुद्यांवर सातत्याने मतभेद निर्माण होत राहतील, अशावेळी उद्धव वा आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणी मुख्यमंत्रिपद घेण्यास कितपत इच्छुक असेल हा प्रश्न आहेच. ठाकरे घराण्याने आजवर सत्तेत कोणतेही पद घेतलेले नव्हते. तथापि, आता आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. अशावेळी सत्तापदांचे ठाकरे घराण्याला वावडे नाही, असे स्पष्ट संकेत आधीच देण्यात आले आहेत. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार आले तेव्हा आधी मनोहर जोशी यांना तर नंतर नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्रिपद दिले होते. राणे पुढे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. यावेळी आता संधी चालून येत असेल तर मुख्यमंत्रिपद हे ठाकरे परिवारातच असायला हवे, असा सूर ठाकरे परिवारात असल्याचे सांगण्यात येते. मातोश्रीच्या बाहेर चार दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागलेले होते. आज मात्र खुद्द उद्धव हेच भावी मुख्यमंत्री असल्याचे होर्डिंग लागले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस