मुंबईचे पाणी मुरते कुठे? रहिवाशांमध्ये संताप! महापालिकेत आज बैठक; लोकप्रतिनिधींची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 08:38 IST2025-11-06T08:37:14+5:302025-11-06T08:38:57+5:30
पाणी कुठे मुरते, याचा शोध घेऊन उपाय शोधण्यासाठी होणार बैठक

मुंबईचे पाणी मुरते कुठे? रहिवाशांमध्ये संताप! महापालिकेत आज बैठक; लोकप्रतिनिधींची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोराई, चारकोप, वांद्रे, गोरेगाव पूर्व, सांताक्रूझ पूर्व, शिवडी, घाटकोपर पश्चिमेसह, जोगेश्वरीसारख्या अनेक भागांत कमी दाबाने पुरवठा होत आहे. अनेक भागांत तर दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. या परिसरातील त्रस्त नागरिकांकडून तेथील आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या वतीने आपले पाण्याचे गाऱ्हाणे महापालिकेपुढे मांडले होते. त्यानंतर महापालिकेत गुरुवारी लोकप्रतिनिधी आणि अतिरिक्त आयुक्तांसोबत मुंबईतीलपाणी नेमके कुठे मुरते, याचा शोध घेऊन उपाय शोधण्यासाठी बैठक होणार आहे.
चारकोप आणि गोराई परिसरात पाणीपुरवठ्यात कमी दाबाची समस्या अनेक ठिकाणी आहे. ही समस्या कायम असताना आता या परिसरातील काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवासी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. गोराईसोबत, मालाड, जोगेश्वरी, दिंडोशी, कुरार यांसारख्या भागातही कमी दाबाने पाण्याच्या समस्या आहेत. खासदार रवींद्र वायकर यांनी या समस्या पालिका जलअभियंत्याकडे तक्रारी मांडल्या होते. या समस्येमुळे रहिवाशांत संताप आहे.
सांताक्रूझ पूर्वेकडील मराठा कॉलनीतील पटेलनगरालगत नवजीवन सोसायटी, दौलत सोसायटी, शांतीलाल कंपाउंड या भागांतही कमी दाबाने पाणी येत आहे. अंधेरी, विलेपार्ले परिसरात हीच समस्या भेडसावत आहे.
४ महिन्यांपासून गोराई, चारकोप विभागातील पाण्याच्या तक्रारीसंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत. तक्रारीदाखल आम्ही गढूळ पाण्याची बाटलीही अधिकाऱ्याना दाखवली होती. या समस्येचे मूळ कारण समजावून आम्ही लोकांच्या पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.
- आ. संजय उपाध्याय
पालिकेकडून मुंबईला आवश्यक तेवढा पाणीसाठा धरणातून उचलला जात आहे. मात्र, पाणी वितरणातील नेमके बिघाड कुठे आहेत, त्यांचे तांत्रिक कारण काय? जल गळती आहे का? याचा शोध आम्ही अधिकाऱ्यांना घ्यायला लावला आहे.
- अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त