Join us

"देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न, मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?" नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:43 IST

Nana Patole Criticize PM Narendra Modi: जनता महागाईने होरपळत आहे,  तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे

मुंबई - महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे,  तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, देशातील जनतेची सकाळ सध्या महागाईच्या बातमीने होते. दररोज वाढणा-या इंधनाच्या किंमतीने आणि महागाईने सर्वसमान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दहा दिवस दररोज पेट्रोल डिझेलची दरवाढ करुन आज व्यावसायीक गॅस सिंलिंडर २५० रुपयांनी महाग केला. या महागाईचे सर्वच स्तरातील लोकांना चटके बसत आहेत. वाढत्या महागाईने चहा सुद्धा महाग झाला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. या महत्वाच्या विषयावर लक्ष देण्यास पंतप्रधान मोदी यांना वेळ नाही मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली परिक्षा पे चर्चा करत आहे. अशीच चर्चा त्यांनी देशातील महागाईसह इतर ज्वलंत प्रश्नावरही करायला पाहिजे.

ज्या व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल ठोस माहिती नाही, स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, ती बोगस आहे असा आरोप केला जात आहे तेच विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थी व पालक दोघांनाही भवितव्याच्या चिंतेने ग्रासले असून पंतप्रधान मोदी मात्र त्यांना कोरडे सल्ले देण्याचे काम करत आहेत. गटारातल्या गॅसवर चहा करण्याचा किस्सा सांगणाऱ्या मोदींकडून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदीनाना पटोलेभाजपाकाँग्रेस