Join us  

विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना विद्यापीठाबाहेरील पोलीस काय करत होते?- रोहित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 6:32 PM

जेएनयूमधील हिंसाचाराच्या विरोधाच्या आंदोलनात रोहित पवार सहभागी

मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध मुंबईतही व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडियाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील आज सहभाग घेतला. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करत असताना बाहेर उभे असलेले पोलीस काय करत होते असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, जेएनयूच्या विर्द्यार्थ्यांनी याआधी फी दरवाढीविरोधात साबरमती हॉस्टेलसमोर महात्मा गांधीजींच्या विचारानुसार शांततेत आंदोलन सुरु असताना जवळपास 40 लोकं विद्यापीठात दाखल झाले व विद्यार्थ्यांना 3 तास मारहाण केली. मात्र विद्यार्थ्यांना मारहाण करत असताना विद्यापीठाबाहेर तैनात असलेले पोलीस काय करत होते असं रोहित पवार म्हणाले. तसेच कोणत्याही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करायचा असेल तर आधी पास घेणे, नोंदणी करणे बंधनकारक असताना अशा परिस्थितीत मारहाण करणारी मुलं कशी आली असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. त्यावेळी दगडफेक आणि हिंसाचारात १८ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. या हिंसाचारात विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड झाली. जेएनयू स्टुडन्ट्स युनियन आणि संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांनी या हिंसाचाराचे खापर परस्परांवर फोडले व त्यात आपले अनेक सदस्य जखमी झाल्याचा दावा केला आहे.  

दरम्यान,  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या  हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही झालेल्या प्रकारावर टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.  

टॅग्स :जेएनयूरोहित पवारमुंबईमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसपोलिसविद्यार्थी