ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:33 IST2026-01-15T15:31:12+5:302026-01-15T15:33:21+5:30
आम्ही भाजपाचं कुंभांड फोडतोय. त्यामुळे आम्ही ताठमानेने त्यांच्यासमोर उभं राहतोय. ते जो दरोडा टाकतायेत तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
मुंबई - मतदानाच्या दिवशीच टपाली मतपेट्या उघडणार आहेत. ही कसली लोकशाही आहे? विरोधक रडीचा डाव खेळतायेत असं मुख्यमंत्री म्हणतात मग निवडणूक आयुक्त त्यांचे घरगडी म्हणून काम करतायेत का? साम, दाम, दंड भेद याचा वापर सगळीकडे सुरू आहे. महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही त्यामुळे निवडणुकीत वाट्टेल ते करा अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गणेश नाईक यांचे मतदान केंद्रच फरार झाले. ४ तास मतदान केंद्र शोधायला लागले. ही एका मंत्र्याची अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीवर इलाज नसेल तर निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायेत आणि सत्ताधाऱ्यांसमोर लाचारी करतायेत. पुरुष मतदारांसमोर महिलांचा फोटो आहे. मतदान केंद्रावर भाजपा उमेदवाराच्या पाट्याच दिसतायेत. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. वन नेशन, वन इलेक्शन त्यासाठी मोदींना हवं. एकाच वेळी सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा अशी टीका त्यांनी केली.
तसेच लोकसभेला कळले, त्यानंतर विधानसभेला कळले त्यानंतर आम्ही दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले. त्यानंतर आजही काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावे लक्षात येतायेत. मतदान केंद्र बदलले जातायेत, मतदार यादीतून नावे गायब आहेत. बोटावरील शाई पुसली जातेय. ही शाई नाही तर लोकशाही पुसली जातेय. ज्याठिकाणी दुबार मतदार आहेत त्यांचे हमी पत्र घेणार होते. असे किती हमी पत्र घेतले आहेत? आम्ही भाजपाचं कुंभांड फोडतोय. त्यामुळे आम्ही ताठमानेने त्यांच्यासमोर उभं राहतोय. ते जो दरोडा टाकतायेत तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतोय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची माणसे हरली आहेत. त्या हरलेल्या मानसिकतेतून त्यांना निवडणुकीत असे गैरप्रकार करावे लागतायेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे. निवडणूक आयोगाचा संपूर्ण स्टाफ रोज काय करत असतो त्याचा छडा लावला पाहिजे. बसल्या जागी पगार खातायेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठेवावे लागतील. तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल. कोर्टात जाऊन करणार काय, एकदा कोर्टात गेले की पुढे ४-५ वर्ष सुरूच राहते. निवडणूक आयोग झोपेचे सोंग करतंय. हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.