भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ; नवाब मलिक यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 12:49 PM2021-06-12T12:49:51+5:302021-06-12T12:59:48+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, असं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले.

We will take the initiative to form a front against the BJP; Statement of Minister Nawab Malik | भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ; नवाब मलिक यांचं विधान

भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ; नवाब मलिक यांचं विधान

googlenewsNext

मुंबई: राजकारण्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शुक्रवारी मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. भाजपचे फाइंड असणाऱ्या किशोर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं. आता, हेच प्रशांत किशोर राष्ट्रवादीच्या पवारांना भेटायला आल्याने काही नवीन गणिते जुळत आहेत का याची चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर शुक्रवारी सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, असं मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. मात्र भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. 

या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांचा भेटीमध्ये कोणतीही राजकीय गणिते नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला आहे. पुण्यामध्ये आज पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी हा दावा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचं म्हणलं आहे. स्वतः प्रशांत किशोर यांनीच हे जाहीर केले आहे की, ते आता राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. त्यामुळे राजकारण करण्याचा संबंध येतच नाही. पवार साहेब अनेकांना भेटत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट होत असते. तशीच ही भेट आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Web Title: We will take the initiative to form a front against the BJP; Statement of Minister Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.