"भानावरती येऊन बोललं पाहिजे"; भुजबळांच्या 'त्या' विधानावर जरांगेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:49 PM2023-11-07T12:49:23+5:302023-11-07T12:54:26+5:30

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.

We should come to our senses and speak; Jarange's counterattack on chhagan Bhujbal's 'that' statement on maratha reservation FIR | "भानावरती येऊन बोललं पाहिजे"; भुजबळांच्या 'त्या' विधानावर जरांगेंचा पलटवार

"भानावरती येऊन बोललं पाहिजे"; भुजबळांच्या 'त्या' विधानावर जरांगेंचा पलटवार

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन पुन्हा एकदा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, कुणबी प्रमाणपत्रासह मराठा समाजाचा इतर मागास वर्गात समावेश होत असून या आरक्षणाला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारला काही प्रश्न विचारले. तसेच, गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यास, आता जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनावेळी ज्यांनी काही नेत्यांची घरं जाळली, जाळपोळ केली ती माणसं आमची नाहीत, असं जरांगे म्हणत होते. मग, जर ती माणसं तुमची नाहीत, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते मागे घेण्याची मागणी तुम्ही का करताय, असा सवाल भुजबळांनी विचारला. त्यावर, आता जरांगे यांनी पलटवार केला आहे. 

जरा भानावर येऊन बोललं पाहिजे जबाबदारीने, असे म्हणत जरांगेंनी भुजबळांच्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं. आमची साखळी उपोषण करणारी पोरं, आमरण उपोषण करणारी पोरं, ज्यांनी शांततेत रास्तारोको केले आणि ते घराकडं परतले. त्यानंतर, मराठा समाजाचं शांततेत चाललेलं आंदोलन बदनाम व्हावं, यासाठी कुणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आमच्या पोरांनी शांततेनं आंदोलनं केली होती, ती पोरं आता रोष धरुन टार्गेट केली जात आहेत. त्या पोरांना उचलून आत टाकलं जात आहे. जे सप्ताहात बसले आहेत, जे साखळी उपोषणात बसले, त्यांना आत टाकलं जात आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका करत भुजबळांवर पलटवार केला. तसेच, या पोरांवर कारवाई करू नका, असं आमचं म्हणणं आहे, असेही पाटील यांनी म्हटलं. 

जाळपोळीतील घरांचे नुकसान देणार का?

दरम्यान, जरांगेंच्या सभेसाठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मग, आंदोलनादरम्यान, जाळपोळीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही नुकसान भरपाई सरकार देणार का, असा सवाल भुजबळ यांनी विचारला.  

जरांगे पाटलांना शुभेच्छा

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. ७० वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते. भुजबळांनी छत्रपती संभाजीनगर येथे असून मनोज जरांगे यांची भेट टाळली. तसेच, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले.
 

 

Web Title: We should come to our senses and speak; Jarange's counterattack on chhagan Bhujbal's 'that' statement on maratha reservation FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.