Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही निवडणुका एकनाथ शिंदेंच्या...', अजित पवार नाराजीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 19:42 IST

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनी सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमात काही दिवसांपासून सहभाग घेतला नसल्यामुळे या चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, दोन दिवसापूर्वी अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. या भेटीमुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या चर्चांवर आज खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 

निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज, सचिन अहिर म्हणाले, 'आगे आगे देखो...'

खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार अजिबात नाराज नाहीत. माध्यमात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. दोन दिवसापूर्वी आम्ही दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली, यावेळी आम्ही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामान्य परिस्थितीवर चर्चा केली. कोणत्याही नाराजीचा विषयच नाही, असं स्पष्टीकरणही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलं.

"मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रातील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत. तिनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहोत, वारंवार काहीजण अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहे, असा आरोपही पटेल यांनी केला.

पटेल म्हणाले, नाराजीच्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नका. दिल्लीत नाराजीवर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही असं मी जबाबदारीने सांगतो, असंही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

निधी वाटपावरुन अजित पवारांचे आमदार नाराज

 

शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये निधी वाटपावरुन नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार गटातील काही आमदारांनी निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केले असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार सचिन अहिर म्हणाले, आमचे सहकारी आमच्यासोबत असताना जे टीका करत होते, आरोप करत होते. मोठ्या मनाने त्यांनी गेलेल्यांचा स्विकार केला. आज ही वस्तुस्थिती त्यांच्या नजरेत आलेली आहे, निधीचा वाटप हा समान होणार नाही. आगे आगे देखीये होता है क्या, असा सूचक इशारा यावेळी आमदार अहिर यांनी दिला. 

टॅग्स :प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारभाजपाएकनाथ शिंदे