"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:05 IST2025-11-25T18:05:11+5:302025-11-25T18:05:56+5:30
मागील काही दिवसांपासून महायुतीमध्ये शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे दिसत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे.

"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविराधात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही बोलले जात होते. भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते.
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले,“जे होतं ते आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या मनाने बोललो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर फडणवीसांनी आम्हाला सांगितलं की मी आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना देईल की आपल्या युतीमध्ये कुठेही गालबोट लागता कामा नये. आपली युती अभेद्य राहिली पाहिजे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिंदे यांनी दोन्ही पक्षांनी त्याबाबतची काळजी घेतली पाहिजेस अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शिंदे म्हणाले, मी प्रचार करत आहे, देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचार करत आहेत. अजित पवार हे देखील प्रचार करत आहेत. प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी युती, आता मी कालच मनमाड आणि नांदगावला गेलो होतो. त्या ठिकाणी शिवसेना-भाजपाची युती आहे. काही ठिकाणी अजित पवार आणि शिवसेनेची युती आहे. काही ठिकाणी युती नाही. मग स्थानिक मुद्दे काय आहेत आणि तेथील स्थानिक विकास हे लोकांना पाहिजे. त्यामुळे आम्हाला काही अडचण येत नाही.